जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पिकांचे नुकसान

582

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुका, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी व अंबड तालुक्यातील शहागड परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळ-वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार गारा तर काही ठिकाणी तुरळक गारा पडल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेले पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यामागील शुक्लकष्ट संपण्याचे नाव घेत नसून मंगळवारी सायंकाळी 6 वाजेनंतर बदनापूर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस व गारा पडला. यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या ज्वारी, हरभरा, गहू पिकाबरोबरच द्राक्षे, आंबे या फळबागांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अनेक गावात 25 ते 30 मिनिटापर्यत जोरदार गारपीटीबरोबर पाऊस पडला.

बदनापूर तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात पाऊस न पडल्यामुळे व लष्करी अळीच्या आक्रमणात पूर्ण खरीप हंगाम गेला. त्यानंतर परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीने रब्बी हंगामात गहू, ज्वारी व हरभरा या पिकाचा पेरा शेतकऱ्यांनी केला. परंतु आता ऐन सोंगणी व काढणीच्या वेळेस मंगळवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले यामुळे काढणीस जमा करून ठेवलेली गहू, हरभरा व ज्वारीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील म्हसला, नंदखेडा, भाकरवाडी, ढासला येथे जोरदार गारपीट झाल्याने खरीप पिकाबरोबरच द्राक्षे व आंबे या फळबागांचेही नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झालेला होता. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीसह परिसरात वादळवाऱ्यासह पाऊस झाला
असून यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथे पंधरा मिनिटे गारांचा पाऊस झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या