लग्नाचा हॉल करी वधू-वरपित्याचे हाल; मंगल कार्यालयाच्या शोधात मुंबईकरांची थेट डोंबिवली, विरारपर्यंत धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे खोळंबलेल्या लग्नसमारंभांना यंदा मोकळी वाट मिळाली आहे. तुलसीविवाहानंतर सर्वत्रच लगीनघाई सुरू झाली आहे. मात्र मुंबईतील बऱयाच वधू-वराच्या कुटुंबीयांची मंगल कार्यालयांचा शोध घेताना पुरती दमछाक झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील बहुतांश मंगल कार्यालयांचे जानेवारीपर्यंतच्या मुहूर्ताचे बुकिंग आधीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे वधू-वराच्या कुटुंबीयांना थेट डोंबिवली, विरारपर्यंत हॉलसाठी धाव घ्यावी लागत आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले आहे. लग्नाच्या शुभकार्यातही हे विघ्न बनून आड आले आणि अनेकांच्या लग्नकार्यांना ब्रेक लागला. ठरलेली लग्ने वर्षे-दीड वर्षे खोळंबली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्ने पुढे ढकलण्याचा निर्णय वधू-वराच्या कुटुंबीयांनी घेतला. आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर विवाहबंधनात अडकण्यासाठी तयार असलेल्यांनी यंदा लग्नाचा बार उडवून द्यायचाच, असा पक्का निर्धार केला आहे. ज्या वधू-वरांनी कोरोना महामारी येण्याआधी मंगल कार्यालयांचे बुकिंग केले होते, त्यांनी आपल्या आधीच्या बुकिंगच्या आधारे पसंतीचे मुहूर्त निवडले. मात्र ज्यांनी वर्ष-दीड वर्षापूर्वी लग्न जुळूनही मंगल कार्यालयांचा शोध घेतला नव्हता, त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरांतील बहुतांश मंगल कार्यालयांचे मुहूर्तांचे बुकिंग आरक्षित झाले आहे. त्यामुळे लग्नाचा मुहूर्ताचा साधण्यासाठी लग्नाचे वऱहाड अगदी डोंबिवली, विरारपर्यंत नेण्याची वेळ अनेक वधू-वर कुटुंबीयांवर आली आहे.

आम्ही गेल्या महिनाभरापासून मंगल कार्यालयांचा शोध घेतोय. लग्न दीड वर्षांपूर्वीच ठरलेय. त्यामुळे यंदाचा मुहूर्त पक्का केलाय. पण हॉल मिळणे फार मुश्कील झाले. महिनाभरात विलेपार्लेपासून मालाडपर्यंत 50 हून अधिक मंगल कार्यालयांकडे प्रत्यक्ष जाऊन किंवा फोनवरून चौकशी केली. पण एकाही ठिकाणी आम्हाला हव्या असलेल्या मुहूर्ताचे बुकिंग होऊ शकले नाही. अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
–
अजय राऊत, जोगेश्वरी

शाळा, मंदिरांमध्ये साखरपुडय़ांचा बेत

लग्नांबरोबर साखरपुडय़ांसाठी जागा शोधावी लागत आहे. छोटे–मोठे हॉलही मिळेनासे झाल्यामुळे सध्या बंद असलेल्या शाळांचे वर्ग किंवा मंदिरांमध्ये साखरपुडय़ाचे कार्यक्रम केले जात आहेत. साखरपुडय़ाला मोजकीच मंडळी येतात. त्यामुळे शाळा, मंदिरांचा पर्याय आहे. पण लग्नसमारंभासाठी कुठे कुठे फिरायचे, असा प्रश्न वधू–वराच्या कुटुंबीयांना सतावत आहे.

आमच्या सूर्यवंशी हॉलचे डिसेंबर-जानेवारीपर्यंतच्या लग्न मुहूर्तांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. किंबहुना फेब्रुवारीतील निम्मे मुहूर्तही आरक्षित झाले आहेत. सध्या पुढील दोन महिन्यांतील लग्न मुहूर्त नसलेल्या तारखा बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.
– प्रियंका पाटील, संचालिका, मयूर कॅटरर्स