
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता हार्बर रेल्वेचा विस्तार लवकरच बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. विस्तारीकरणाचे काम पश्चिम रेल्वे करणार असून हा प्रकल्प मार्च 2025पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. विस्तारीकरणानंतर प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते बोरिवली असा थेट प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
सध्या हार्बर रेल्वे सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव या दरम्यान धावतात. एमयूटीपी-3 अंतर्गत हार्बर मार्गाचे विस्तारीकरण बोरिवलीपर्यंत करण्याची योजना आहे. गोरेगाव ते बोरिवली या सात किमीच्या अंतराच्या विस्तारासाठी अंदाजे 825 कोटी 31 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. उपलब्ध जागा लक्षात घेऊन गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्ग काही ठिकाणी उन्नत करण्याचा विचार आहे. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपासून विरारपर्यंत करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे नियोजन आहे.
खार ते बोरिवली सहावी मार्गिका 2024पर्यंत
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सहाव्या रेल्वे मार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात खार ते गोरेगाव दरम्यानचा मार्ग मार्च 2023पर्यंत तर दुसऱया टप्प्यात गोरेगाव ते बोरिवली मार्ग मार्च 2024पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.
























































