
सामना प्रतिनिधी । डोंबिवली
चांदिवली येथील नाल्यात वाहून गेलेला हर्षल जिमकलचा शोध आज अखेर सकाळी नऊ वाजता थांबला. ३६ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर आरे येथील ज्योतीनगर येथे त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे गांधीनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
गांधीनगर येथील मुक्ता इमारतीमध्ये राहणारा २४ वर्षीय हर्षल हा डिप्लोमा इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत होता. मंगळवारी रात्री चांदिवली परिसरातून मित्रांसोबत घरी परतत असताना तो लघुशंका करण्यासाठी नाल्याजवळ उभा राहिला व त्याचा पाय घसरून नाल्यात पडला. त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरड करत त्याला काचकण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी जोरदार पडत असलेल्या पाऊसामुळे तुडुंब भरलेल्या नाल्यात तो प्रवाहासोबत वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सर्व मित्रपरिवार त्याला रात्रभर शोधत होते. सोबत अग्निशमन दल, पालिका कर्मचारी, ठाण्याचे आपत्कालीन पथकही होते. पण त्याचा कुठेच ठावठिकाणा न लागल्यामुळे गुरुवारी नेवीच्या जवानांना पाचारण करण्यात आले, पण त्यांनी शोध घेण्याआधीच हर्षलचा मृतदेह आरे गावात सापडला.






























































