
सामना प्रतिनिधी । बीड
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाने मृत्यूलाही आव्हान देत स्वातंत्र्य आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि साहसाचा परिचय करून देणारे ‘हे मृत्युंजय !’ या नाटकाच्या दोन प्रयोगाचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 25 जानेवारी रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले असल्याची माहिती डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी दिली आहे.
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेच्या वतीने ‘हे मृत्युंजय!’ या नाटकाचे प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य आणि विचार नव्या पिढीसमोर पोहोचवावेत या हेतूने करण्यात येत आहेत. आजपर्यंत या नाटकाचे 30 प्रयोग झाले आहेत. 25 जानेवारीपासून ही संस्था मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात या नाटकाचे प्रयोग करणार असून दौऱ्याचा प्रारंभ बीडपासून होत आहे. सकाळी 10 वाजता सादर होणारा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी असून सायंकाळी सर्व सावरकरप्रेमींसाठी प्रयोग सादर केला जाणार आहे अशी माहिती डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अनामिका या संस्थांनी तरूणाईसाठी या नाटकाची खास निर्मिती केली असून फर्जंद सारखा अद्वितीय मराठी युद्धपट देणाऱ्या दिगपाल लांजेकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आता हे नाटक बीड शहरवासीयांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत प्रकाशयोजना आणि दूरदर्शन मालिकेतील अजिंक्य नानावरे (सख्या रे, कलर्स मराठी) शार्दूल आपटे (तू माझा सांगाती, कलर्स मराठी) बिपिन सुर्वे (तू अशी जवळी रहा, झी युवा) अशा लोकप्रिय कलाकारांचा यात सहभाग असून मराठी रंगभूमीवर सादर झालेले सर्वोत्कृष्ट ‘कारागृहनाट्य’ म्हणून या नाटकाचा विविध नाट्यसमीक्षकांनी गौरव केला आहे.

























































