उन्हाळ्यात होऊ शकतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उकाड्याने हैराण झालात. उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. उन्हाळ्याचा आपल्या शरीरावर, त्वचा, डोळे आणि पचन प्रक्रियेवर देखील परिणाम होतो. अशातच निष्काळजीपणा करणे आपल्याला महागात पडू शकतो. आज आपण उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल जाणून घेणार आहोत. सोबतच या आजारांपासून बचावण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे ही जाणून घेणार आहोत.

अन्न विषबाधा

अन्न विषबाधा हा उन्हाळ्यातील एक सामान्य आजार आहे. हे आजार बाधित अन्न किंवा पाण्यामुळे होते. उष्णता आणि आर्द्रतेमुळे या ऋतूत बॅक्टेरिया सहज वाढतात, ज्यामुळे अन्न बाधित होते. बाधित अन्न खाल्याने पोटदुखी , मळमळ आणि उलट्या होणे सुरू होते. हे आजार टाळण्यासाठी कच्चे मांस तसेच उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.

कांजिण्या

कांजिण्या येणे हा उन्हाळ्यातील एक सामान्य आजार आहे. खाज सुटणे, फोड येणे, लाल डाग, ताप, भूक न लागणे आणि डोकेदुखी हे या आजाराचे सामान्य लक्षणे आहेत. बहुतेक लहान मुले या आजाराला बळी पडतात. यापासून बचावासाठी सर्वात जास्त सुरक्षित मार्ग म्हणजे त्याची लस घेणे.

टायफाइड

टायफाइड हा बाधित अन्नामुळे होणारा आजार आहे. सडकून ताप येणे, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी, डोकेदुखी आणि भूक न लागणे याची सामान्य लक्षणे आहेत. हे टाळण्यासाठी नेहमी स्वच्छ अन्न खा. विशेषत: नेहमीच स्वच्छ पाणी प्या.