
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी नव्याने अर्ज दाखल केला आहे. मलिक यांच्या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी ईडीकडून वेळ मागण्यात आल्याने न्यायाधीशांनी मलिक यांच्या अर्जावरील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवली आहे.
ईडीने नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. या प्रकरणातून सुटका व्हावी तसेच वैद्यकीय जामीन मिळावा म्हणून मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला, मात्र न्यायाधीशांनी अर्ज फेटाळून लावले. आता मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेनेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. गेल्या सुनावणीवेळी, तपास यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार विशेष सत्र न्यायालायात आज न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ईडीने याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी आणखी वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 19 जुलै रोजी निश्चित केली.




























































