विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार! पुढचे तीन महिने चटक्यांचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्याला उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. मुंबईत गेल्याच आठवडय़ात पारा चाळिशीपार गेला होता, तर मराठवाडा आणि विदर्भात 42 ते 43 डिग्री सेल्सियसपर्यंत पारा चढला होता. पुढच्या तीन महिन्यांत उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून विदर्भ, मराठवाडय़ात उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या वतीने आज सोमवारी एप्रिल ते जून दरम्यानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला. हे तीन महिने राज्यभरात उन्हाची तीव्रता आणखी वाढेल, असे सांगण्यात आले आहे. राज्याच्या अनेक भागांत पारा 5 डिग्री सेल्सियसने वाढणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए.के. श्रीवास्तव यांनी सांगितले. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढेल, असेही ते म्हणाले. या भागात आधीच नद्या, विहिरी कोरडय़ाठाक पडल्याने दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे.

राज्यात सर्वाधिक तापमान बीड येथे 43.5 डिग्री सेल्सियस इतके नोंदवण्यात आले.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येणार.

शहर          तापमान
मुंबई           32
महाबळेश्वर    34
नांदेड          42
मालेगाव       41
बीड           43
अकोला       42
अमरावती     42