
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण किनारपट्टीला सलग चौथ्या दिवशी समुद्री उधाणाचा जोरदार तडाखा बसला आहे. किनारपट्टीलगत असलेल्या देवबाग गावात समुद्राचे पाणी हॉटेल परिसर तसेच रस्त्यावर घुसले. अनेक ठिकाणी बंधारा वाहून गेला असून किनारपट्टीचा काही भाग समुद्राने गिळंकृत केला आहे. देवबाग संगम येथील स्मशामभूमीही वाहून गेली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून खवळलेल्या समुद्राच्या जोरदार लाटांनी किनारपट्टी हादरली आहे.
दरम्यान सरपंच जानव्ही खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, मनोज खोबरेकर, मकरंद चोपडेकर, नागेश चोपडेकर, बाबली चोपडेकर, मोरेश्वर धुरी व अन्य सदस्य यांनी किनारपट्टीची पाहणी केली. व ग्रामपंचायत येथे तातडीची बैठक घेत उपाय योजना बाबत आढावा घेतलाउधानाचा व वाऱ्यांचा जोर आणखी काही दिवस असाच राहणार असून आषाढी एकादशीला उधानाचा जोर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देवबाग सरपंच व लोकप्रतिनिधी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी फुटलेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी किनारपट्टीवर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याची मागणी केली जाणार आहे.
आचरा, तळाशील व तोंडवळी किनारपट्टीलाही उधानाचा जोर दिसत आहे. मालवण बंदर जेटटी् येथेही जोरदार लाटा धडकत होत्या. समुद्री उधाणा सोबत किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हडी गावकरवाडी येथील शंकर विष्णू गावकर यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे.
कलंडलेल्या धोकादायक खांबांवरून वीजपुरवठा
समुद्र किनारपट्टीवर अगदी बंधाऱ्या लगत उभारण्यात आलेल्या वीज खांबांवरून संपूर्ण देवबाग गावास वीजपुरवठा होतो. पण बंधाऱ्याचे दगड कोसळल्याने वीज खांबाही कलंडले आहेत. उधानाचा जोर कमी झाल्याशीवाय वीज खांब बदलणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्ली खाडीच्या संगमावर देवबाग गावची स्मशानभूमी आहे. मात्र पावसात मोठ्या उधाणात स्मशानभूमीत पाणी घुसते. मात्र गेले चार दिवस सातत्याने येणाऱ्या उधाण स्थितीने संपूर्ण स्मशानभूमीच समुद्राने गिळंकृत केली. दरम्यान समुद्रात वाहून जाणारी शवदाहिनी ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने बांधून खाजगी जागेत ठेवली आहे. तसेच गड नदी आणि रमाई नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मसुरे व लगतच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला चिंता भेडसावू लागली आहे.




























































