बळीराजाचे अश्रू पुसा! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळले. सरकार सर्वतोपरी या शेतकऱ्यांना मदत करीत आहे. या बळीराजाच्या घराघरात पोहोचून त्यांच्या शेतीचे पंचनामे झाले का, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली का याची माहिती घ्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले.

दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मंगळवारी बैठक घेतली. रात्री 10 वाजता सुरू झालेली ही बैठक 12.30 वाजेपर्यंत चालली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांची मदत, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, विकासकामे अशा विविध विषयांसदर्भात जिल्हाप्रमुखांशी चर्चा केल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली.

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱयांपर्यंत पोहोचतेय की नाही याची माहिती घ्या. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पंचनामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेताना तसेच माहिती गोळा करताना आरोग्यसेविका, आशासेविकांना अडचणी येऊ नयेत यासाठी खबरदारी घ्या, अशा सूचनाही शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

शिवसेनेची सदस्य नोंदणी जिह्याजिह्यांत

जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी शिवसेना घराघरात पोहोचायला हवी. यासाठी शिवसेनेच्या सदस्य नोंदणी उपक्रमाला वेग द्या. प्रत्येक जिह्यात शिवसेनेचे कमीतकमी 40 हजार नवीन सदस्यांची नोंदणी व्हायला हवी, अशाही सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही

आपापल्या भागात कोणती विकासकामे रखडली आहेत याची माहिती घ्या. जनतेच्या हितासाठी विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. आपापल्या मतदारसंघांतील विकासकामांचा आढावा घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले.