रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; तोणदे येथे भूस्खलन, जांभारीत घरावर दरड कोसळली

रत्नागिरीत पावसाचा हाहाकार सुरुच असून भूस्खलनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील हातीस-तोणदे येथे भूस्खलन होऊन जनावरांचा एक गोठा जमिनदोस्त झाला. अनेक ठिकाणी घरांचे आणि जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तोणदे येथे भूस्खलन होऊन केतन कीर यांचा जनावरांचा गोठा पूर्णपणे जमीनदोस्त झाला. टिके गावातील कांबळेवाडी येथील संजय सांडीम यांच्या गोठ्याचे नुकसान झाले. जांभारी कुणबीवाडी येथील मंगेश येलये यांच्या घरावर दरड कोसळून दरडीची माती आली आहे. दापोली तालुक्यातील मौजे आमणवायंगी पंदेरी रस्त्यावर दरड कोसळली आहे. या ठिकाणी दरड हटवण्याचे काम चालू आहे. मौजे उन्हवरे येथे लियाकत कादरी यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे.

चिपळूण तालुक्यात मौजे चिपळूण वेरळ रस्त्यावर दरड कोसळली आहे. या ठिकाणी दरड हटवण्याचे काम सुरु आहे. गुहागर तालुक्यातील मौजे तुरळ येथील संगिमा मोहिते त्यांच्या घराचे 54 हजार 100 रुपयांचे, अशोक मयेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. कारुळ येथील जमिनीला भेग पडली आहे. त्या ठिकाणच्या 20 घरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मौजे पालशेत येथील अंगणवाडीवर फांदी पडून 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही ठिकाणी जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 89.83 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

मंडणगड – 53.70 मिमी
दापोली – 59.10 मिमी
खेड – 83.90 मिमी
गुहागर – 75.70 मिमी
चिपळूण – 17.50 मिमी
संगमेश्वर – 124.90 मिमी
रत्नागिरी – 18.20 मिमी
राजापूर – 84.20 मिमी
लांजा – 131.30 मिमी

आपली प्रतिक्रिया द्या