
सामना प्रतिनिधी । ठाणे
एकीकडे अवघा महाराष्ट्र आषाढी वारीत रंगून गेला असतानाच मध्यरात्रीपासून ढगांचे ढोल आणि विजांचे टाळ-मृदुंग वाजवत मुंबईपासून कोकणापर्यंत पावसाचीही तुफान वारी निघाली. मुंबईत रिपरिपणाऱया पावसाने ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला मात्र धू-धू धुतले. पावसाने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे ठाण्यातील उल्हास, वालधुनी, काळू, वसईतील सूर्या तर रायगडात महाडमधील सावित्री, गांधारी, नागोठण्यातील अंबा, रोह्यातील कुंडलिका नद्यांचे पाणी गावांत शिरले. त्यामुळे पुरती दाणादाण उडाली. गावागावांतील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. ठिकठिकाणी झाडे कोसळली, घरांची पडझड झाली. कल्याण ते कर्जत आणि कर्जत ते पनवेल मार्गावरील रूळ पाण्याखाली गेले, तर पुराचा वेढा पडल्याने कल्याण-नगर आणि खोपोली-पाली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, प्रशासनाने समुद्रात धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावला असून ‘जागते रहो..’ चा इशारा दिला आहे.
जगबुडी, नारिंगी संतापली
जगबुडी व नारिंगी या दोन्ही नद्यांना आलेल्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने खेड शहराला पुराचा वेढा पडला आहे. जगबुडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने तर बोरघरनजीक महामार्गच पाण्याखाली गेल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. सायंकाळी उशिरा एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड-दापोली मार्गही पाण्याखाली गेल्याने खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती.
कल्याण ते कर्जत, कसारा रेल्वेसेवा ठप्प
कल्याण रेल्वे स्थानकात पाणी फलाटापर्यंत चढले. कर्जत-कसारा मार्गावरील रूळही अनेक ठिकाणी पाण्याखाली गेले. त्यामुळे कल्याण ते कसारा, कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली. कर्जत ते पनवेल रेल्वे मार्गावरही दीड फुटापेक्षा जास्त पाणी भरले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवाही सकाळी कोलमडून पडली.
महाडला सावित्री, गांधारीच्या पुराचा वेढा
दोन नद्यांच्या तीरावर वसलेल्या महाडला पुराचा सर्वाधिक फटका बसला. दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी महाड शहरात शिरले. त्यामुळे हजारो महाडकर अडकून पडले. बाजारपेठ, मंडई, दस्तुरी परिसर पाण्याखाली गेला. दुपारी पावसाने किंचित उघडीप दिली, परंतु संध्याकाळी पुन्हा तुफानी हजेरी लावल्याने महापुराच्या भीतीने महाडकरांमध्ये घबराट पसरली.
वसईच्या चिंचोटी धबधब्यावर १२ पर्यटक अडकले; एकाचा मृतदेह सापडला
वसईच्या चिंचोटी धबधब्यात १०० हून अधिक पर्यटक अडकून पडले होते. एनडीआरएफच्या जवानांनी झाडांना दोऱया बांधून ९७ पर्यटकांची सुटका केली. या बचावकार्यादरम्यान भाविश गुप्ता याचा मृतदेह सापडला. अजून १७ ते १८ वयोगटातील १२ जण या धबधब्याच्या परिसरात अडकून पडले असून त्यांची नावे प्रणय बने, अजय कळंबाटे, गौरव सुर्वे, मोहित सोनी आणि नीतेश सोनी अशी आहेत. इतरांची नावे मात्र समजू शकली नाहीत.






























































