
परतीच्या पावसाने आज पुन्हा कोल्हापूर, नगर आणि सांगली जिह्यांना झोडपले. कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मिरज तालुक्यातील दूधगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने दोनशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. तर, तासगाव आणि वाळवा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. नगर जिह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, कर्जत तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. सोलापूर आणि साताऱयातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातून 50 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून, दगडी पूल पाण्याखाली जाणार आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. ऊन आणि पावसाच्या खेळामुळे पिकांवर रोगराई पसरत आहे.
दूधगावात ढगफुटी; 200 घरांमध्ये घुसले पाणी
सांगली जिल्ह्यात बहुतांशी भागांत मंगळवारी पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात मिरज तालुक्यातील दूधगाव परिसराला ढगफुटीसदृश पावसाने झोडपले. ढगांच्या गडगडाटासह अचानक आलेल्या पावसाने दोनशेहून अधिक नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दूधगाव-बागणी, तसेच कवठेपिरान रस्त्यावरील ओढय़ाला पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. मिरज तालुक्यासह तासगाव, वाळवा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला.
सांगली जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पुन्हा परतीचा पाऊस बरसत आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यांत दोन दिवसांनंतर पडलेल्या दमदार पावसानंतर पश्चिम भागात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. दूधगाव येथे पहाटे पाच वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल चार तास पावसाने झोडपून काढले. दोनशेहून अधिक घरांत पाणी शिरले. मराठी मुलांची शाळा परिसर, सावर्डे गल्ली, कुंभार गल्ली, म्हेत्रे गल्ली, स्टॅण्ड परिसरातील बहुतांशी घरांमध्ये पाणी शिरले. कर्मवीर पुतळ्यालाही पाण्याने वेढा घातला. किराणा दुकान, पानपट्टी, पिठाची गिरणीमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतातील सऱया भरून वाहत होत्या. काही ठिकाणी नव्याने केलेली उसाची लागणही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याचे चित्र होते. हायस्कूल आणि मराठी शाळेच्या भोवती तलावाचे स्वरूप निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी द्यावी लागली. बागणी-दूधगाव, कवठेपिरान येथील ओढे भरून वाहत होते. सांगली शहरातही मंगळवारी सकाळी जोराचा पाऊस झाला.
द्राक्षांवर ‘डाऊनी’चा फैलाव
सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाळवा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी आहे. खरीप पिकांची काढणी सुरू आहे. पश्चिम भागात आगाप सोयाबीन आणि भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. पावसाने मिरज आणि वाळवा तालुक्यांत सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून दोन्ही पिकांची काढणीही ठप्प झाली आहे. तासगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पडणाऱया पावसामुळे द्राक्षांवर ‘डाऊनी’ रोगाचा फैलाव झाला आहे.
कोल्हापुरात विजांचा कडकडाट
कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दुसऱया दिवशीही तडाखा लगावला. पहाटे आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. परतीच्या पावसाचा जिह्यात 40 किलोमीटर परिसरातील शेतीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून कोसळणाऱया जोरदार व हलक्या पावसाच्या सरींनी शेतकऱयांना पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. नवरात्रोत्सवानंतर आता पुन्हा सर्वत्र परतीच्या पावसाने जोर धरला आहे. दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे जिह्यात झालेल्या वातावरणीय बदलातून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कधी उष्णता, तर कधी थंडी यामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या वाढली असून, गल्लीबोळातील रुग्णालये ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत.
हातकणंगलेतील भुयारी मार्गात 10 फूट पाणी
हातकणंगले परिसराला मंगळवारी पहाटेपासून ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले. या पावसाने हातकणंगले-इचलकरंजी मार्गावरील रखडलेल्या व बहुचर्चित रेल्वे भुयारी मार्गावर आठ ते दहा फूट पाणी साचले, तर गावातून जाणाऱया रस्त्यावर ओढय़ाचे पाणी आल्याने 11 वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. हातकणंगले-इचलकरंजी मार्गावर गेले वर्षभर अत्यंत संथ गतीने रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मोठय़ा रहदारीच्या या मार्गावर रेल्वे फाटकामुळे होणाऱया वाहतुकीच्या कोंडीला पर्याय म्हणून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, या भुयारी मार्गाचे काम करताना पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी असताना रेल्वे प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे या मार्गावरील वाहनांना पाण्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.
नगर शहरात पाणीच पाणी
नगर शहरासह जिह्यात पावसाने मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसाने धावपळ उडाली. शहरात दुपारी उशिरापर्यंत काही भागांत पाऊस सुरू होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, वातावरणात गारवा जाणवत होता. अचानकपणे कडाक्याचे ऊनदेखील पडत होते. ग्रामीण भागात बाजरीची काढणी, तसेच सोयाबीन आणि मुगाच्या तोडणीला पावसाने उघडीप दिल्याने वेग आला होता. मात्र, आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने ही कामे खोळंबली आहेत. अधूनमधून कडाक्याचे ऊन पडत असल्याने पिकांवर रोगराई पसरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी आणि मंगळवारी सकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱयांसह सर्वांचीच धावपळ उडाली. मंगळवारी सकाळच्या पावसाने नगर शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. शाळेच्या वेळेतच पाऊस झाल्याने बच्चेकंपनीसह पालकांची धांदल उडाली.
खरिपाच्या पिकांचे नुकसान
कर्जत तालुक्यामध्ये सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. सर्वत्र परिसर जलमय झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र, या पावसाने खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी तूर, कांदा, उडीद, डाळिंब, सीताफळ यांसह अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱयांची पिके पाण्यामध्ये आहे. माहीजळगाव परिसरात सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. शहरी व ग्रामीण भागांमधील रस्ते या पावसाने पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत.


























































