लेख – दिवाळी आणि हिंदुस्थानची ‘सॉफ्टपॉवर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

दिवाळी अनेक देशांमध्ये साजरी होणे आणि अनेक राष्ट्रप्रमुखांनी यानिमित्ताने हिंदुस्थानला शुभकामना देणे हे हिंदुस्थानच्या वाढत्या ‘सॉफ्टपॉवर’चे दर्शक आहे. या वाढत्या सॉफ्टपॉवरमुळे हिंदुस्थानला बराच अप्रत्यक्ष फायदा होईल. हिंदुस्थानला जागतिक स्तरावर आपल्या राष्ट्रीय हित सांभाळण्याकरिता, रक्षण करण्याकरिता देशाच्या सर्वसमावेशक ताकदीचा (Comprehensive National Power) वापर करावा लागतो. यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत, हार्डपॉवर (military /economic power ) आणि दुसरी सॉफ्टपॉवर.

दिवाळीचा 2021 सण जगभरात आणि देशभरात उत्साहात साजरा केला गेला. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हिंदुस्थानच नव्हे, तर जगभरातील सर्व देश दिवाळीच्या जल्लोषात तल्लीन झालेले पाहायला मिळाले.

इंडोनेशियामध्ये बाली बेटांमध्ये देवळांना दिव्यांची रोषणाई केली गेली. सिंगापूरने दिव्यांची आरास करून उत्साहाने आपल्यासारखीच दणक्यात दिवाळी साजरी केली. बाहुल्यांच्या खेळाद्वारे रामायण आणि महाभारत यांचे दर्शन घडवून मलेशियातील दिवाळी साजरी केली गेली. थायलंडने नदीत दिवे सोडून दिवाळी साजरी केली.

याप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीला अधिक अर्थपूर्ण अर्थ आहे. ते म्हणाले, ’राष्ट्रपती आणि प्रथम महिला (राष्ट्रपतींच्या पत्नी) या नात्याने व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना एकत्र दिवा लावणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. बायडेन यांनी त्यांची पत्नी जिल यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये दिवा लावतानाचा फोटो शेअर केला.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही ट्विटरवर दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ जारी केला . अमेरिकेमध्ये दिवाळी साजरी करण्याचा प्रघात बराक ओबामा यांच्या काळामध्ये सुरू झाला. अमेरिकेचे गत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वतःच्या अध्यक्षीय घरात वैदिक मंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा दिवाळी साजरी केली होती आणि तीच परंपरा अजून जास्त प्रमाणात विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी सुरू ठेवली आहे.

न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच वन वर्ल्ड ट्रेड सेंटरला दिवाळीच्या थीमवर आधारित ऍनिमेशनने सजवण्यात आले आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यासोबतच हडसन नदीच्या काठावर फटाक्यांच्या आतषबाजीचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. ही फटाक्यांची आतषबाजी अतिशय मनमोहक होती. फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. अशा प्रकारे अमेरिकेने जगाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जॉन्सन म्हणाले की, आपल्या सर्वांसाठीच्या कठीण काळानंतर मला आशा आहे की, ही दिवाळी खरोखरच खास असेल. वर्षातील हा काळ कुटुंब आणि मित्रांना भेटण्यासाठी असतो.

ब्रिटनमध्ये प्रत्येक हिंदुस्थानी धूमधडाक्यात दिवाळी साजरी करतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या येथील विद्यापीठांतही विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात दिवाळी सेलिब्रेशन करतात. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या वतीने दिवाळीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याव्यतिरिक्त लंडन शहरातून दिवाळीनिमित्त एक मोठी मिरवणूक निघते. त्यात अनेक हिंदुस्थानी आणि विदेशी लोक सहभागी होतात. मिरवणुकीमध्ये हिंदुस्थानी वाद्ये, नाच आणि कपडे यांचे मनोहारी दर्शन होते.

थायलंडमध्येही दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी केली गेली. श्रीलंकेत दिवाळी या सणालाही विशेष महत्त्व आहे कारण ते महाकाव्य रामायणाशी संबंधित आहे. मलेशियामध्ये दिवाळी हरी दिवाळी म्हणून साजरी केली. शेजारी नेपाळमध्ये दिवाळी हा सण साजरा केला. दिवाळीच्या दिवशी जपानमधील लोक त्यांच्या बागेतील झाडांवर कंदील आणि कागदाचे पडदे लावतात. त्यानंतर कंदील  आकाशात सोडले जातात. या दिवशी लोक नाचतात आणि गातात आणि दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी करतात.

ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला. शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात हिंदुस्थानी संस्कृतीवर आधारित अनेक कार्यक्रम, नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम झाला.

ऑकलंड शहर आणि वेलिंग्टन या न्यूझीलंडच्या राजधानीच्या शहरात दिवाळीच्या आधी दोन आठवडे दिवाळी मेळा साजरा केला. त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले. पार्लमेंटच्या इमारतीसमोर भलीमोठी रांगोळी काढली गेली.

हिंदुस्थान, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

एखाद्या देशात आपला प्रभाव वाढविण्यासाठी अन्य कोणत्याही उपायांपेक्षा ‘सॉफ्टपॉवर‘चा वापर अधिक परिणामकारक ठरतो. हिंदुस्थानचे राष्टी^य हित जपण्याकरिता ‘सॉफ्टपॉवर‘ला सध्या महत्त्व दिले जात आहे. साधारणतः ‘हिंदुस्थानी सॉफ्टपॉवर’ उल्लेख केला जातो, तेव्हा बॉलीवूड, चित्रपटसंगीत, पर्यटन, धार्मिक स्थळे व पाककृतींची उदाहरणे दिली जातात. जगात हिंदुस्थानची लोकप्रियता वाढवण्यास त्याची मदत होते. गेल्या काही वर्षांत अनिवासी हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानी वंशाच्या परदेशी नागरिकांना आपल्या देशाच्या धोरणात सहभागी केले आहे.

थोडक्यात, परदेशातील हिंदुस्थानींची सॉफ्टपॉवर किंवा मृदूशक्ती दिवाळीमुळे सर्व जगासमोर आली आहे. हे सर्व देश हिंदुस्थानच्या बाजूने धोरणे बनवून हिंदुस्थानशी व्यापार, सामरिकसंबंध वाढवण्यास मदत करतील. मात्र याकरिता वेगवेगळ्या देशांतील हिंदुस्थानींनी स्वतःचा धर्म, जात, प्रदेश विसरून एक हिंदुस्थान म्हणून त्या त्या देशात एकत्रित होण्याची गरज आहे.

वेगवेगळ्या देशांत राहणाऱया हिंदुस्थानींनीही तिथे प्रबळशक्ती म्हणून उदयास यावे, जगाने कोणत्याही विषयात हिंदुस्थानमागे ठाम उभे राहावे, ही अपेक्षा आहे.