दूरदर्शन केंद्राच्या महिला टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा, तिरुवनंतपुरम केंद्रातील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cctv

केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दूरदर्शन केंद्राच्या महिला टॉयलेटमध्ये एक छुपा कॅमेरा आढळल्यानं एकच खळबळ उडाली.

अधिकाऱ्यांनी आधी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांना भीती होती की दूरदर्शनमध्ये येणाऱ्या व्हीआयपी गेस्ट आणि महिला स्टाफवर त्याचा परिणाम होऊ नये. मात्र मलयामल इंडिया टुडेने या घटनेचा रिपोर्ट छापल्यावर दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीने टॉयलेटमध्ये कॅमेरा लपवला होता तो दूरदर्शनमध्ये नोकरीला आहे. त्याला तात्काळ नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. आरोपीने दूरदर्शन केंद्राच्या मुख्य स्टुडिओजवळ असलेल्या शौचालयात कॅमेरा बसवला होता.

या शौचालयाचा वापर व्हीआयपी गेस्ट आणि सेंटर स्टाफकडून केला जातो. हे प्रकरण दूरदर्शनमध्ये उघड झाल्यानंतर दाबण्याचा प्रयत्न झाला. त्याबद्दल कुणाला काही कळू दिले नाही. ही घटना उघड झाल्यास व्हीआयपींवर त्याचा परिणाम होईल अशी त्यांना भीती होती. मात्र हळूहळू ही बातमी बाहेर पडली आणि एका वृत्तपत्रात छापून आली. त्यानंतर गहजब उडाला. अखेर अधिकाऱ्यांनी कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली.

तसेच संबंधित आरोपीला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं. अनेक अभिनेते-अभिनेत्री, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते दूरदर्शनच्या तिरुवनंतपुरम केंद्रात येत असतात. त्यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.