टोलेजंग इमारती उभारताना अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होते का? हायकोर्टाचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bombay-high-court-1

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत ठिकठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहत असून या इमारतींमध्ये आगीच्या घटना घडू नयेत म्हणून अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते काय, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज पालिका प्रशासनाला विचारला. तसेच पुढील सुनावणीवेळी याप्रकरणी सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले.

विकासकाकडून अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नाही, आगीच्या घटनेत रहिवाशांचे नाहक बळी
उंच इमारती उभारताना विकासकाकडून अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे आगीच्या घटनांत रहिवाशांचे नाहक बळी जातात असा आरोप करीत डॉ. शर्मिला घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. नियमानुसार विविध सोसायटय़ांकडून अग्निसुरक्षेसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असते, मात्र तसे होताना दिसत नाही असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी याचिकाकर्त्यांनीही पालिकेकडून याबाबत दक्षता घेतली जात नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

सर्व ती खबरदारी घेतली आहे
या प्रकरणी पालिकेच्या वतीने ऍड. सुरेश पाकळे यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, उंच इमारतींमध्ये अग्निसुरक्षा पुरवली जाते की नाही त्याची तपासणी केली जाते. तसेच आगीच्या घटना घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.