
मालेगाव खटल्यात होणारी दिरंगाई पाहता मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्यात उशीर होत राहिला तर या खटल्याला बरीच वर्षे लागतील असे मत व्यक्त करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठाने एनआयएला गेल्या महिनाभरात सत्र न्यायालयात सुरू असलेल्या मालेगाव खटल्याचा प्रगती अहवाल, रोजनामा सादर करण्याचे आदेश दिले. केंद्रीय तपास यंत्रणेने पुरावे नोंदवण्यासाठी दररोज एकाऐवजी किमान दोन साक्षीदारांना बोलवावे असे बजावले.
मालेगाव येथे 2008 बॉम्बस्फोट झाला. यात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी व इतर काही जणांविरोधात खटला चालविण्यात आला. मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए न्यायालयाने लवकर निकाली काढावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने देऊनही या खटल्यावरील सुनावणी संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणातील संशयित समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या समोर आज सुनावणी झाली. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा सद्यस्थितीचा अहवाल दोन आठवडय़ांत प्रतिज्ञापत्रावर सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला गेल्या सुनावणीवेळी दिले होते. त्यानुसार एनआयएचे वकील संदेश सावंत यांनी आज प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात 495 साक्षीदारांपैकी 256 जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून 218 जणांची साक्ष नोंदवणे अद्याप बाकी असल्याचे म्हटले आहे. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, खटल्याची प्रगती पाहण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून पाक्षिक अहवाल मागवणे आम्हाला योग्य वाटते. तसेच एनआयए गेल्या एक महिन्याचा न्यायालयाचा रोजनामादेखील सादर करेल जेणेकरून आम्हाला कळेल की, खटल्याला कोण विलंब करत आहे आणि कोण सहकार्य करत आहे.
याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
याचिकाकर्ते समीर कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, डिसेंबर 2020 मध्ये ट्रायल संपवण्यात येईल अशी हमी एनआयने दिली होती. नंतर ऑक्टोबर 2021 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली. आता जुलै 2022 उजाडले असून अद्यापही खटला झालेला नाही. त्यावर खंडपीठ म्हणाले की, कोविडमुळे या खटल्याला उशीर झाला असावा. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

























































