‘उडान’ फेम कविता चौधरी यांचे निधन

दूरदर्शनवरील ‘उडान’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कविता चौधरी (62) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्या पार्थिवावर अमृतसर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘उडान’ ही मालिका दूरदर्शनवर 35 वर्षांपूर्वी प्रसारित झाली होती.

कविता यांनी या मालिकेत आयपीएस बहिणीचे आयुष्य लोकांसमोर मांडले होते. हा टीव्ही शो देशाच्या दुसऱया आयपीएस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या कथेवर आधारित होता, ज्याचे दिग्दर्शन तिची बहीण कविता चौधरी यांनी केले होते आणि तिने त्यात मुख्य भूमिकाही साकारली होती. केवळ 30 भागांच्या या टीव्ही मालिकेला त्याकाळी प्रचंड दाद मिळाली. ‘योर ऑनर’ आणि ‘आयपीएस डायरीज’ या शोमध्येदेखील त्या झळकल्या होत्या.