
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिराची विटंबना केली आहे. कॅलिफोर्नियाच्या नेवार्क भागामध्ये ही घटना घडली असून खलिस्तानी समर्थकांनी स्वामीनारायण मंदिराला निशाणा बनवले. अमेरिकेच्या हिंदू-अमेरिकन फाऊंडेशनने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत.
स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर खलिस्तानी समर्थकांनी काही घोषणा लिहिल्या आहेत. याची माहिती नेवार्क पोलिसांनाही देण्यात आली असून तपास सुरू आहे. ही घटना म्हणजे ‘हेट क्राईम’ माणण्यात यावी आणि त्याअनुषंगाने तपास करून सदर आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती हिंदू-अमेरिकन फाऊंडेशनने दिली.
A Hindu temple has been vandalised with anti-India and pro-Khalistan graffiti on its exterior walls in Newark, California, United States. Newark Police has assured a thorough investigation into the incident. pic.twitter.com/ruhEY6nkv1
— ANI (@ANI) December 23, 2023
दरम्यान, खलिस्तान्यांचा उत्पात जगभरात सुरू असून अमेरिकेआधी कॅनडामध्येही असाच प्रकार समोर आला होता. कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांनी मध्यरात्री सरे शहरातील एका मंदिरामध्ये तोडफोड केली होती आणि मंदिराच्या मुख्य दारावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याचे पोस्टर चिटकवले होते.
आरोपींनी केलेले हे घृणास्पद कृत्य मंदिरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले होते. यात दोन लोकं मंदिरामध्ये प्रवेश करताना दिसतात. दोघांनीही चेहरा लपवलेला होता आणि निळी पगडी घातली होती. त्यानंतर ते मंदिरामध्ये प्रवेश करून तोडफोड करतात आणि मंदिराच्या मुख्य दारावर पोस्टर चिटकवून फरार होतात.
मंदिराच्या मुख्य दारावर ज्या हरदीप सिंग निज्जर याचे पोस्टर लावण्यात आले होते त्याची 18 जून रोजी कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅनडातील ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेमध्ये सक्रिय होता. तो मूळचा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी होता. जानेवारी 2022मध्ये जालंधरमध्ये हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप निज्जर याच्यावर होता आणि एनआयएने त्याला फरार घोषित करत त्याच्यावर 10 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.


























































