हिंगोलीत रानडुकरच्या हल्ल्यात पाचजण जखमी; दोन गंभीर

339
रानडुकरांच्या कळपाने चढवलेल्या हल्ल्यात शेतामध्ये हळद व गहू काढणीचे काम करणारे 5 जण जखमी झाले असून यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी या गावात ही घटना सोमवारी घडली.
हिंगोली जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये सध्या हळद काढणीचे काम सुरू आहे. सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी या गावातील किसन सखाराम तनपुरे (50) यांच्यासह  साहेबराव आनंदराव पोले (50), चतुराबाई गणेश कोकरे (45)  सागर बाबाराव खरात (25)  अन्नपूर्णा बाई गणेशराव पोले (30) हे त्यांच्या शेतात काम करत होते. दरम्यान, आठ ते दहा डुकरांचा कळपाने या शेतात येऊन शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला चढवला. एका डुकराने तनपुरे यांना जोराची धडक देऊन चावा घेतला. तर साहेबराव पोले हे देखील शेतात काम करीत असताना पाठी माघून येऊन पायाला चावा घेतला.  महिला ह्या गहू कापनीचे काम करीत होत्या. यातील महिलांनाही डुकराने जोराची धडक दिली. महिलांना देखील मार लागला आहे. पोले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.  इतर चार रुग्णावर हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सध्या हिंगोली जिल्ह्यात गहू व हळद काढणीची कामे सुरू असुन  त्यामुळे शेतकरी पावसाच्या भीतीपोटी घाईगडबडीत आपला गहू कापून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा पंचनामा करून वन विभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांकडुन केली जात आहे.
आपली प्रतिक्रिया द्या