फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना नवसंजीवनी मिळणार, पालिका खर्च करणार 2.51 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिका 2 कोटी 51 लाख 49 हजार 636 रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे या वास्तूंना नवसंजीवनी मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

फोर्ट विभागात पुरातन वास्तूंचे प्रमाण अधिक आहे. परंतु त्या वास्तूंची योग्य देखभाल होत नसल्याने उपाययोजना म्हणून आणि पुरातन वास्तूंचे मूळ सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेकडून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या कंत्राटदाराला वास्तूंच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षांचा करार करण्यात येणार आहे.

ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई, स्टीम क्लिनिंग, दुरुस्ती आणि पीयू कोटिंग ही कामे केली जाणार आहेत. कारंजे, पंप, दिवे, विद्युत यंत्रणा, लॉनची नियमित देखभाल होणार आहे. तर महत्त्वाच्या ठिकाणी 24×7 सुरक्षा व्यवस्था आणि सनशेड कॅनोपी उभारण्यात येणार आहे. महापुरुष व हुतात्म्यांच्या कांस्य व संगमरवरी पुतळ्यांची स्वच्छता आणि पॉलिशिंग केले जाणार आहे.