
सामना प्रतिनिधी । नगर
आगामी काळात पाण्याची उपलब्धता आणि उन्हाळ्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता राज्यात आठमाही पिके घेण्याचे धोरण अवलंबवावे लागणार आहे. हे लक्षात आल्याने आदर्श गाव हिवरे बाजारने यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले असून 31 डिसेंबरच्या विशेष ग्रामसभेत यावर चर्चा होणार आहे.
गेल्या सतरा वर्षांपासून दरवर्षी 31 डिसेंबरला सायंकाळी गावात विशेष ग्रामसभा घेण्यात येते. यामध्ये गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करण्यात येते. पाण्याचा ताळेबंद मांडण्याची पद्धतीही हिवरेबाजारने या ग्रामसभेच्या माध्यमातून केली. आता त्यापुढे जाऊन पीक पद्धतील बदल घडविण्याचा गावाचा विचार आहे. या वर्षीच्या ग्रामसभेला जोडून यशवंतराव चव्हाण प्रशासन अकादमी (यशदा) आणि हिवरेबाजार यांच्या वतीने जलसाक्षरता उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजता गावात होणार्या या सभेला राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव आर. आर. पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नाशिक विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, जलप्रेमी व जलदूत यांची आढावा बैठक या वेळी होणार आहे. यावर्षी आठमाही पीक पद्धतीवर भर देण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. या काळात जनावरांच्या चार्याचा आणि पाण्याचाही प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे शेतात दुसरे पीक घेण्याऐवजी चारा पिके घ्यायची. त्यातून वाचलेले पाणी जनावरांना मिळू शकेल. शिवाय पाण्यावाचून पिके जळण्याचे प्रकारही टाळता येतील. त्यामुळे शेतात जी पिके घ्यायची ती उन्हाळा सोडून इतर आठ महिन्यांतच, असे धोरण आता ठरविण्याची वेळ आली आहे, अशी माहिती राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली. पवार यांनी अलीकडेच बँकॉकचा दौरा केला आहे. त्यामध्ये या विषयासंबंधीही माहितीचा येथे उपयोग करण्यासाठी काही योजना विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. हिवरेबाजारमधील ग्रामसभेत घेतले जाणारे अनेक निर्णय राज्याला दिशा देणारे ठरले आहे. पाण्याचा ताळेबंदही राज्यपातवळीवर पोहचला आहे. त्यानुसार आता पुढील आठमाही पीक पद्धतीच्या विचार, प्रयोग आणि प्रसारासाठी हिवरेबादार सज्ज होत आहे.
ग्रामसभेत गेल्या वर्षीच्या ग्रामसभेतील कामांचा आढावा, ग्रामपंचायत विविध खात्यांचे जमाखर्चाचे वाचन, 14 व्या वित्त आयोगातून वर्षभरात केलेली कामे व प्राप्त अनुदान यांचे वाचन, 2019-20चे अंदाजपत्रक, वर्षभरात संत गाडगेबाबा अभियान व स्मार्ट ग्राम अभियान पुरस्कार रकमेतून करावयाच्या कामांची सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे 2018-19 साठे पाण्याचा ताळेबंद मांडण्यात येणार आहे.


























































