
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी मोठी चमक दाखवत यंदा पुन्हा रौप्यपदक पटकावले आहे.हि कामगिरी उत्साहवर्धकच आहे. जाकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक तर आम्ही मिळवणारच ,असा दृढ विश्वास व्यक्त करीत हिंदुस्थानी हॉकी प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी २०२०च्या टोकियो ऑलीम्पिकमधे हॉकीचे सुवर्णपदक हे आपले मोठे स्वप्न असल्याचे सांगितले आहे. हरेंद्र यांची चौथ्यांदा हिंदुस्थानी हॉकी संघाच्या मुख्य प्रशिकपदी नियुक्ती झाली आहे.
ब्रेडा,नेदरलँड येथे पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आम्हाला मागच्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकाचा रंग सोनेरी करता आला नाही.तरीही संघातील युवा आणि अनुभवी हॉकीपटूंचा खेळ उत्तम झालाय असे प्रतिपादन हरेंद्र यांनी केले.चॅम्पियन ट्रॉफी हा आता आमच्यासाठी इतिहास झालाय ,असे सांगून हरेंद्र म्हणाले ,आता आमचे सारे लक्ष जाकार्ता एशियाडच्या पूर्वतयारीकडे लागले आहे .हिंदुस्थानी संघ आपले एशियाडचे सुवर्णपदक राखणारच असा मला विश्वास आहे. टोकियो ऑलिम्पिक हॉकीसाठीची पात्रता आम्ही नक्कीच मिळवू.पण ऑलीम्पिक हॉकीचे सुवर्णपदक पटकावून हिंदुस्थानी हॉकीचे सुवर्णयुग परत आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. आशियाई स्पर्धेनंतर ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी आम्हाला दोन वर्षे मिळणार आहेत. टोकियोत हिंदुस्थानी हॉकी संघ दाखल होईल तो सुवर्णपदकासाठीचा प्रबळ दावेदार म्हणूनच, असा दृढ विश्वासही हरेंद्रसिंग यांनी बोलून दाखवला.
जुन्या -नव्यांचा संगम लाभदायक ठरला
यंदाच्या चॅम्पियन्स चषकात जुन्या आणि नव्या युवा खेळाडूंचा संघातील संगम लाभदायकच ठरला असा दावा हॉकी प्रशिक्षक हरेंद्र यांनी केला .ते पुढे म्हणाले ,अनुभवी सरदारसिंग आणि युवा खेळाडू दिलप्रीतसिंग व विवेक सागर प्रसाद यांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले.आमचा बचाव आणि आक्रमण दोन्हीही भक्कम झाले.जगातील बलाढ्य संघांनाही आमच्या या खेळाची दाखल घ्यावी लागली आहे.याच यशाच्या शिदोरीवर हिंदुस्थानी संघ जाकार्ता आशियाई स्पर्धेत आपले सुवर्णपदक राखणारच असा मला विश्वास आहे.आता आपण मागे वळून पहायचे नाही हा सल्लाच मी प्रत्येक हिंदुस्थानी खेळाडूला दिलाय. एशियाडसाठीचा हिंदुस्थानी हॉकी संघ येत्या मंगळवारी निश्चित करण्यात येईल ,पण संघाची अधिकृत घोषणा नंतर होईल असेही हरेंद्र यांनी स्पष्ट केले.आपला बचाव आणि आक्रमण सुरेख होत आहे ,पण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात प्रवेश केल्यावर आपले फॉरवर्ड्स गोंधळतात हि त्रुटी दूर केली तर भविष्यात हिंदुस्थानी हॉकी संघ पुनः टॉपवर जाईल असे प्रतिपादनही हरेंद्र यांनी केले.

























































