
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, मुंबईपासून कोकणातील बा देवा महाराजा …आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा, टोरा, म्हातारे-कोतारे मिळान साजरो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर रे आणि काय जी इडा पीडा, वाकडा-नाकडा असात त दूर कर रे महाराजा …ह्या होळीये सोबत सगळ्यांच्या मनातलो राग, रूसवो-फूगवो जळान खाक होऊ देत आणि सगळी माणसा माणुसकीन एकमेकांसोबत नांदु देत रे महाराजा होय महाराजा…ग्रामदेवतेसमोर अशी गाऱ्हाणी घालत कोकणात शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कोकणात शिमगा धूमधडाक्यात साजरा होत आहे. ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री भैरीबुवाची पालखी मध्यरात्री बारा वाजता वाजत-गाजत मंदिराबाहेर पडली. पालखीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.नवलाई-पावणाई आणि श्री भैरीबुवाची पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा रंगला. रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 680 ठिकाणी खासगी आणि 1 हजार 220 ठिकाणी सार्वजनिक शिमगा उत्सव साजरा करण्यात आला.जिल्ह्यात 620 ठिकाणी पालखी उत्सव रंगला. ग्रामदैवतेची पालखी मोठ्या उत्साहात नाचवली गेली.रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 680 ठिकाणी खासगी आणि 1 हजार 220 ठिकाणी सार्वजनिक शिमगा उत्सव साजरा झाला.

























































