पोलिसांच्या गुणवंत मुलांचा जंगी सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या जवळ काहीच नाही असा विचार करत बसू नका. परिस्थितीचा बाऊ न करता, मी निवडलेल्या मार्गावर यशस्वी होणारच अशा आत्मविश्वासाने वाटचाल करा. त्यासाठी अपार मेहनत आणि कर्तृत्वत्वान व्यक्तींची प्रेरणा घ्या…असा मूलमंत्र पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या अंमलदारांच्या गुणवंत मुलांना दिला. आयुष्याच्या वाटचालीत आई-वडील आणि ज्येष्ठांचा सदैव आदर करा, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.

जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पोलीस अंमलदारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा शुक्रवारी आझाद मैदान येथील प्रेरणा सभागृहात मोठय़ा उत्साहात पार पडला. दहावीच्या परीक्षेत 96 टक्के मिळवणाऱ्या विष्णू चव्हाण, श्रुती घोसाळकर, प्रांजल कांबळे यांच्यासह 51 पोलीस पाल्यांचा यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपये रोख व सॅकबॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे काwतुक करताना फणसळकर म्हणाले की, अंमलदारांच्या पाल्यांनी एवढे गुण मिळविणे ही साधी बाब नाही. यशाची शिखरे अशीच पादाक्रांत करा. आपल्या या यशस्वी वाटचालीत आई-वडिलांचा त्याग असतो हे नेहमी स्मरणात ठेवा. पोलीस खात्यात आई-वडील असणे ही तुमची प्रेरणा आहे. आपल्या परिस्थितीचा कधीच बाऊ करू नका, आपल्यापेक्षा लाखो मुलं या देशात अनेक गोष्टींपासून वंचित आहेत. त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती खूप उत्तम आहे. आपल्याला उत्तम बुद्धी मिळाली आहे. तुमची शक्ती, प्रेरणा आणि ऊर्जा हे सर्वात मोठे भांडवल आहे. याच भांडवलाच्या जोरावर तुम्ही उंच शिखर गाठाल, अशी आशा यावेळी आयुक्त फणसळकर यांनी व्यक्त केली.

 याप्रसंगी माटुंगा पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार सारिका उबाळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला. आयुक्तांनी जनसहयोग फाऊंडेशनच्या कार्याचे काwतुक करत आभार मानले. यावेळी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, निवृत्त एसीपी प्रफुल्ल भोसले तसेच मिलन मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. तर संदीप चोणकर यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.

ही बंधने नक्की पाळा…

आपल्या कृतीमुळे अभिमान वाटला नाही हरकत नाही. पण लाज वाटण्यासारखे करू नका. आनंद  देता आला नाही चालेल, पण दुःख होईल असे करू नका. मान खाली जाईल असे काही करू नका, अशी बंधने आपण पाळली तर आपण आपल्या आई-वडिलांबरोबर राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल कराल, असेही फणसळकर यावेळी म्हणाले.

दहावीच्या परीक्षेत प्रत्येकी 95 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ऋतुजा आणि ऋग्वेदा उमेश गावकर या जुळय़ा बहिणी सत्कार सोहळय़ाच्या आकर्षण ठरल्या.