
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही रुग्णालयांमध्ये किती बेपर्वाईने आणि निष्काळजीपणे काम केले जाते याचं उत्तम उदाहरण मीरारोडमध्ये बघायला मिळालं. इथे राहणाऱ्या भुजंग शेट्टी (वय-70) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे पार्थिव सोपवण्यात आले. अंत्यविधीसाठी जेव्हा हे पार्थिव घरी आणण्यात आले तेव्हा भुजंग यांच्याऐवजी आपल्याला भलत्याचाच मृतदेह दिल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं.
मीरारोडमधल्या भक्ती वेदांत रुग्णालयात संतप्त झालेली शेट्टी मंडळी घुसली आणि त्यांनी मोठ्या आवाजात घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. घडलेला प्रकार आणि रुग्णालयाकडून झालेली चूक कळताच कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. प्राथमिक चौकशीमध्ये शवागरातील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आले आहे. या प्रकाराबद्दल रुग्णालयाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी शेट्टी कुटुंबीयांनी केली आहे.
शवागरातील मृतदेह कुटुंबीयांना देताना पहिले मृतकाचा चेहरा हा दाखवला जातो. मात्र अनंत शंकर सावंत नावाच्या कर्मचाऱ्याने असं न करता भलत्याच माणसाचा मृतदेह कापडात गुंडाळून शेट्टी कुटुंबीयांना देऊन टाकला. ही चूक अक्षम्य असून सावंतविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि त्याला निलंबित करण्यात आलं आहे असं रुग्णालयाचे संचालक डॉ.अजय संखे यांनी सांगितलं आहे.

























































