
कोरोनामुळे हॉटेल, लॉज, रिसॉर्टसह संपूर्ण आदरातिथ्य क्षेत्राला मोठा धक्का बसला. या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करून अधिक चालना देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची ग्वाही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या क्षेत्रातील उद्योगांना दिलासा मिळाला असून वीज, पाणी, मालमत्ता कर सवलतीत म्हणजे औद्योगिक दराने आकारले जाणार आहे.
औद्योगिक दर्जा मिळाल्याच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून 1 एप्रिल 2021 पासून वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर व अकृषिक कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून औद्योगिक दराने कर / शुल्क आकारणीसाठी निकष ठणविण्याकरीता एक तज्ञ समिती नेमून राज्याचे निकष निश्चित करण्यात येतील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून निकषांची पूर्तता करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना औद्योगिक दराने कर/शुल्क आकारणी लागू करण्यात येईल.




























































