
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना म्हणजे क्रीडाप्रेमींना पर्वणीच असते. हा सामना वर्ल्डकपमधील असेल तर मग टेन्शन, खुन्नस आणि थरार पाहायला मिळतेय. याची अनुभुती रविवारी प्रेक्षकांनी घेतली ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या सुपर-12 लढतीत अखेर टीम इंडियाने चार गडी राखून बाजी मारली.
पाकिस्तानकडून मिळालेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुलने (4) नसीम शाहच्या गोलंदाजीवर चेंडू यष्टय़ांवर ओढून आत्महत्या केली. हारिश रऊफच्या गोलंदाजीवर इफ्तिखारने रोहितचा स्लीपमध्ये सुरेख झेल टिपत पाकिस्तानला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर रऊफने सूर्यकुमार यादवला (15) यष्टीमागे रिझवानकरवी झेलबाद केले, तर बढती मिळालेला अक्षर पटेल (2) दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्याने हिंदुस्थानची 6.1 षटकांत 4 बाद 31 अशी दुर्दशा झाली.
हिंदुस्थानचा डाव संकटात सापडलेला असताना वन डाऊनला आलेला विराट कोहली व पाचव्या क्रमांकावर आलेला हार्दिक पांडय़ा यांनी जबाबदारीने खेळ करीत पाकिस्तानी गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 113 धावांची बहुमोल भागीदारी करून हिंदुस्थानला संकटातून बाहेर काढले. या जोडीने शाहिन शाह आफ्रिदीच्या 18 व्या षटकांत 17, तर हारिस रौफच्या 19 व्या षटकांत 15 धावांची लयलूट केली. हिंदुस्थानला अखेरच्या 6 चेंडूंत विजयासाठी 16 धावांची गरज होती. मोहम्मद नवाझने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला बाबरकरवी झेलबाद करून सामन्यातील रंगत वाढवली. कोहलीने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला अन् तो चेंडू नो बॉलही ठरल्याने हिंदुस्थानचा दुहेरी फायदा झाला. दिनेश कार्तिक (1) पाचव्या चेंडूवर बाद झाल्याने सामना दोलायमान हिंदोळ्यावर झुलत होता. अश्विन फलंदाजीला आला. अखेरचा चेंडू वाईड गेला अन् सामना बरोबरीत आला. मग अश्विनने एक धाव घेत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट कोहलीची नाबाद 82 धावांची खेळी अखेर निर्णायक ठरली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान लढत पुन्हा पाहायला मिळू शकते का? असा सवाल केला जातोय. तर याचे उत्तर हो असून याची शक्यता मात्र कमी आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील थरार पुन्हा अनुभवण्यासाठी दोन्ही संघांना फायनलमध्ये प्रवेश करावा लागेल.
मात्र म्हणतात ना क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. कारण 2007 मध्ये रंगलेल्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला होता. त्यावेळी हिंदुस्थान, पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये होते. साखळी सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानला पराभूत केले. सुपर ८ मध्ये हिंदुस्थानचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत हिंदुस्थानने उपांत्य फेरी गाठली. तर पाकिस्तानने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा, तर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान असा अंतिम फेरीतील सामना रंगला. यात हिंदुस्थानने बाजी मारत वर्ल्डकप उंचावला होता.
View this post on Instagram


























































