
पेपरफुटी प्रकरणात राजकारण नको
माझे सरकार परीक्षांच्या पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी वचनबद्ध आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नावर देशव्यापी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
देशात सलग तिसऱयांदा बहुमताचे सरकार आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आज पूर्ण जगात होत आहे, असे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप आणि एनडीए सरकारवर स्तुतीसुमने उधळी. यावरून राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी आरडा-ओरडा करत आक्षेप नोंदवला. तर सत्ताधारी सदस्यांनी बापं वाजवून राष्ट्रपतींच्या वक्तव्याच समर्थन केले. आणीबाणीचा मुद्दा, नीट परीक्षेतील गोंधळ, इशान्येकडील राज्यांची सुरक्षा आदी मुद्यांवरून प्रचंड गदारोळ झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांपुढे अभिभाषण केले. यावेळी आमचे सरकार देशातील प्रत्येक तरुणाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यात गुंतले आहे, असे सांगत नवीन शैक्षणीक धोरणांचा उल्लेख राष्ट्रपती मुर्मू यांनी करताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नीट-नीटच्या घोषणा देत नीट परिक्षेतील गोंधळाकडे लक्ष वेधले. त्यावर राष्ट्रपतींनी माझं म्हणणे ऐकून घ्या, असे आवाहन विरोधकांना करत पेपर फुटीच्या प्रकरणात कठोर पावले, उचलली जास्तील असे आश्वस्त केले.
आणीबाणीवरून कॉँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी साधलेल्या संवादामध्ये आणीबाणीचा ‘काळा दिवस’ म्हणून उल्लेख केला. त्यानंतर सत्ताधारी गटाकडून सातत्याने आणीबाणीवर आक्रमक भूमिका मांडली जात आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली, असे म्हणत कुरापत काढली.
आणीबाणीबाबत काय म्हणाल्या राष्ट्रपती
‘जेव्हा संविधान तयार होत होतं, तेव्हाही जगात असे गट होते जे भारताच्या अपयशी होण्याची इच्छा व्यक्त करत होते. देशात संविधान लागू झाल्यानंतरही संविधानावर अनेकदा हल्ले झाले आहेत. 25 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी ही संविधानावरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता’, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.






















































