गुलमर्गमध्ये केबल कार बिघडली; 300 पर्यटक हवेत लटकले, सात तासांनी सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱया कश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या शेकडो पर्यटकांना आज अतिशय भयंकर प्रसंगाला सामोरे जावे लागले. बारामुल्ला जिह्यातील गुलमर्ग गोंडोला रोपवेमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि सर्व केबिन थांबले. त्यात बसलेले सुमारे 300 पेक्षा जास्त पर्यटक हवेतच अडकले. हवेत अधांतरी लटकलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यासाठी अखेर लष्कराची मदत घेण्यात आली. तब्बल 7 तास बचाव मोहीम राबवून सर्व पर्यटकांना खाली उतरवण्यात आले.

गुलमर्ग गोंडोला हे श्रीनगरपासून 51 किलोमीटर अंतरावर आहे. गुलमर्ग-गोंडोला रोपवे हा दोन टप्प्यांत विभागण्यात आला आहे. एक टप्पा गुलमर्गला कोंगडोरीशी जोडतो, तर दुसरा टप्पा कोंगडोरी ते अफरवात असा आहे. दोन्ही मार्गावर मिळून 108 केबिन कार आहेत. देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी हे एक ठिकाण असून उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये या ठिकाणी हजारो पर्यटक आले आहेत. आज शेकडो पर्यटक या रोपवे केबिनमधून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत प्रवास करत होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक रोपवेमध्ये बिघाड झाला आणि सर्व केबिन थांबले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली. अनेकांनी आरडाओरड सुरू केली. बराच वेळा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, मात्र काही वेळात बचाव कार्य सुरू करण्यात आले. मुख्य मोटर थांबवून केबिनमधून पर्यटकांना विशेष दोरखंडाद्वारे खाली उतरवण्यात आले. स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी बचाव मोहीम सुरू केली, मात्र मोठ्या संख्येने अडकलेले पर्यटक पाहता अखेर लष्कराला पाचाराण करण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ही मोहीम ताब्यात घेतली. रोपवेमध्ये बिघाड कशामुळे निर्माण झाला, याचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, खराब हवामानामुळे बिघाड झाल्याचा अंदाज असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

24 तासांमध्ये दुसऱयांदा बिघाड

या रोपवेमध्ये रविवारीदेखील बिघाड निर्माण झाला होता. मात्र, दुरुस्ती करून आज पुन्हा सेवा सुरू करण्यात आली. अवघ्या 24 तासांमध्ये दुसऱयांदा बिघाड निर्माण झाला आणि शेकडो पर्यटक अडकले. या रोपवेवर यापूर्वी 25 जून 2027 रोजी मोठा अपघात झाला होता. वादळामुळे एक झाड गोंडोलाजवळ केबल वायरवर पडले. त्यामुळे एका केबिनमधील काच फुटून सात पर्यटकांचा खाली पडून मृत्यू झाला होता.

65 केबिन थांबल्या, लष्कराला पाचारण

प्राप्त माहितीनुसार, बिघाडामुळे 65 केबिन हवेतच थांबल्या. अडकलेल्या पर्यटकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक तास केबिनमध्येच अडकल्यामुळे या सर्वांचे भूक आणि तहान लागून प्रचंड हाल झाले. लहान मुलांचा आक्रोश थांबत नव्हता. महिलांची प्रचंड अडचण झाली. हे केबिन जमिनीपासून किमान 500 फूट उंच होते. त्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.