
कैलास भरोदे, शहापूर
संक्रांतीत तोंड गोड केल्यानंतर ‘तिखटा’ साठी दुसऱ्या दिवशी ‘कर’ला शिकार करण्याची प्रथा आज काही ठिकाणी सुरू आहे. मात्र या प्रथेच्या आड अनेक सराईत शिकारी टोळय़ा जंगल संपत्ती लुटण्यासाठी सक्रीय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहापूरचे वनविभाग सतर्क झाले असून वनसंपदा धोक्यात आणणारी प्रथा मोडून काढण्यासाठी आणि शिकारी टोळी जेरबंद करण्यासाठी जंगलामध्ये जाळे पसरवले आहे. गाकपातळीकरील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांसह वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून रात्रीची गस्त घालून पाळत ठेकली जाणार असून शिकाऱ्याचीच शिकार होऊन त्यांच्यावर किंक्रांत ओढवणार आहे.
बेकायदेशीर होणारी वृक्षतोड आणि जंगलांना आग लावून करण्यात येणारी अवैध शिकार यामुळे वन्यप्राणी प्रजातींचा निवास व वनसंपत्तीचा ऱ्हास होत चालला आहे. यामुळे चारा व पाण्याची कमतरता यांसारख्या अडचणींना वन्यजिवांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा भयंकर परिणाम त्यांच्या प्रजनन व वनसंवर्धनावर होऊन त्यांची संख्या रोडावत चालली आहे. तालुक्यातील बिरवाडी, शेरा, आसनगाव, लतिफवाडी आदी ठिकाणी शिकारीच्या घडलेल्या घटना उघडकीस येऊन शिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी शिकारीला पायबंद बसला नसल्याने वनकिभाग आता रात्रीची गस्त घालून शिकाऱ्यांवर पाळत ठेवणार आहे. संक्रांतीनंतर ‘कर’ चा मुहूर्त साधत शिकारी टोळ्या मोठय़ा कौशल्याने आणि ठरावीक काळात आणि क्षेत्रात कार्यरत असतात. या संघटित टोळ्यांना अटकाव करण्यासाठी वनव्यवस्थापन समित्यांचे सदस्य, वनपाल, वनकर्मचारी यांसह वनाधिकाऱ्यांनी पथक तयार केले असून डोळ्यात तेल घालून ते रात्रभर गस्त घालणार आहेत.
मोखाडा व भिवंडी तालुक्यातील काही वनक्षेत्रासह शहापूर तालुक्यात सुमारे 60 हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण झालेल्या व मनमोहीत करणारे वनक्षेत्र बारंगी, बारकोडी, मुरुडशेंग, कडुजिरे, शतावरी, पांढराकोडा, अंबरकंद, रानभेंडी अशा विविध आजारांवर उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती आहेत. जंगलात बिबटय़ा, नीलगाय, मुंगूस, वानर, भेकर, कोल्हा, चितळ, रानडुक्कर, मोर, ससा, पाणकोंबडा, भारद्वाज या कन्य पशुपक्ष्यांचा मुक्त संचार आहे. वनसंपदेच्या रक्षणासाठी शहापूर, खर्डी, काशाळा, विहिगाव, धसई व डोळखांब या सहा ठिकाणी विभागलेल्या वनक्षेत्रात 210 गावाचा समावेश असून तब्बल 150 वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत.






























































