
एका महिलेने धुतलेली रजई बाल्कनीत वाळत घातली आणि चक्क नोटांचा पाऊस सुरू झाला. त्यावेळी इतक्या नोटा पडल्या की, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रजईमध्ये एवढे पैसे कुठून आले, याविषयी सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.
ही घटना चीनमधील अनहुई प्रांतात घडली. येथील एक महिला घराची साफसफाई करत होती. त्यावेळी तिने स्वच्छ धुतलेली रजई बाल्कनीत वाळत घातली आणि त्यातून पैसे पडू लागले. या घटनेचा व्हिडियो चीनमध्य़े सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
साऊथ चीन मॉर्निंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये एक बाई शेजाऱ्याला सांगते, एक मिनिट थांब मी खाली येऊन पैसे घेईन. महिलेने सांगितले की, तिच्या पतीने हे पैसे रजईमध्ये लपवून ठेवले होते. त्याने सुमारे 4400 डॉलर म्हणजे सुमारे 3.59 लाख रुपये रजईत ठेवले होते. पतीने नंतर ही गोष्ट मान्य केली. या घटनेबाबत सोशल मिडियावर युझर्स आपली मते व्यक्त करत आहेत.
एका युझरने म्हटले की, ‘हजारो युआन उडताना पाहून पत्नीचे हात थरथरू लागले असावेत.’ अजून एका युझरने म्हटले आहे की, पत्नी ही देवासारखी आहे. जिने नोटांचा पाऊस पाडला. अनेकांनी तिच्या पतीलाही फटकारले.
एका वापरकर्त्याने सल्ला दिला की, ‘गुपचूपपणे पैसे साठवून ठेवा, कृपया घराची साफसफाई सुरू होण्यापूर्वी रोख हस्तांतरित करा.’ हा सल्ला एका व्यक्तीने दिला होता. साफसफाई करताना त्यांच्या पत्नीला पलंगाखाली लपवलेले पैसेही सापडले. त्या व्यक्तीने सांगितले की, तो जवळपास एक वर्षापासून पैसे साठवत होता, जे क्षणार्धात त्याच्या पत्नीच्या हातात पडले.
महिलेच्या नवऱ्याने सांगितले की, ‘मला जेव्हा काम करून पैसे मिळत असत, तेव्हा त्यातील काही मी पलंगाखाली ठेवत असे. मी खरोखर किती पैसे वाचवले होते हे मला माहित नाही.






















































