चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जाळले, पतीला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला दारुच्या नशेत पत्नील सिगारेट चटके देत तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सचिन निळकंट मोरे (२५ ह.मु. लक्ष्मी कॉलनी छावणी) याचे शिल्पा सोबत २७ मे २०११ रोजी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर शिल्पास आठ – दहा दिवस चांगले वागवले. त्यानंतर सचिनने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. या कारणावरुन शिल्पा आणि सचिन यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होत होते. दोघांमध्ये असलेला वाद मिटावा म्हणून सचिनच्या आई-वडिलांनी शिल्पाला तिच्या माहेरी नेऊन सोडले. सचिनचा राग शांत झालेवर ये म्हणत तिला माहेरात सोडून परतले. ११ महिन्यानंतर तिला परत नांदायला घेऊन आणण्यासाठी सचिन आणि त्याचे आई-वडील गेले कर्नाटकात गेले.

मुलीला चांगले नांदवण्यात येईल काळजी करु नका असा शब्द दिल्यावर शिल्पा संभाजीनगर येथे सासरी आली. सासरी आल्यावर २५ जून २०१२ रोजी सचिन दारु पिऊन आला आणि पुन्हा शिल्पाच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण उकरून काढत तिला सिगारेटचे चटके देऊ लागला. तो त्यावर थांबला नाही तर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.

शिल्पा मदतीसाठी ओरडू लागली असता घराच्या बाहेर बसलेली तिची आई आणि घरमालकीन धावत गेल्या. आग विझवून तिला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिल्पाचा पोलिसांनी आणि विशेष अधिकाऱ्यांनी जबाब नोंदविला. उपचारा दरम्यान शिल्पा ३ सप्टेंबर २०१२ रोजी मरण पावली. शिल्पाच्या मृत्यूपूर्व जबाबावरून छावणी पोलीस ठाण्यात सचिन मोरे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांच्या समोर सुनावणी झाली असता सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाट यांनी ९ साक्षीदार तपासले. न्यायालयाने सचिन यास दोषी ठरवून भादंवि ३०२ कलमान्वये जन्मठेप सुनावली. अ‍ॅड. सुदेश शिरसाट यांना अ‍ॅड. नितीन मोने यांनी सहकार्य केले.