पत्नीची हत्या करुन ‘तो’ 10 दिवस मृतदेहासोबत राहिला, माजलगावातील धक्कादायक प्रकार

14563

सततच्या भांडणास कंटाळून थंड डोक्याने घरात पत्नीची क्रूर हत्या केली व प्रेताचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेऊन तब्बल दहा दिवस तो प्रेतासोबत दोन मुलांना घेऊन राहिला. अखेर दहाव्या दिवशी हा खुनाचा प्रकार उघडकीस येऊन पतीच्या हातात बेड्या पडल्या. हा धक्कादायक प्रकार घडला आहे माजलगाव शहरातील अशोकनगर या भागात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व इंदिरानगर भागात राहणारी रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले व संसार सुरू केला. संजय याने मुस्लीम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने फातेमानगर मंजरथ रोड येथे राहात होता. या दाम्पत्यास दोन मुले होती.

सोमवारी सकाळी अशोकनगरमध्ये नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये आरोपी संशयित स्थितीत दिसून आला.

तसेच आरोपीची पत्नी रेश्मा मागील आठ दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी चक्रे फिरवून संजय साळवे यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्यातून त्याने आठ दिवसांपूर्वी (30 नोव्हेंबरला) पत्नीची धारधार शस्त्रानेर हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले. तसेच फ्रीजमध्ये तिच्या शरीराचे कमरेखालील भागाचे तुकडे आढळून आले. प्रकार गंभीर असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

माजलगाव शहरात अर्धवट जळालेले प्रेत आढळले, घातपाताचा संशय

आपली प्रतिक्रिया द्या