BPO तील नोकरी गेल्याने नवऱ्याने ‘तसले’ धंदे सुरू केले, बायकोचा घटस्फोटासाठी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
divorce

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. इथल्या एका महिलेने नवऱ्यापासून विभक्त होण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. BPO मध्ये काम करणाऱ्या नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर त्याने ‘तसले’ धंदे करायला सुरुवात केली होती. याचा सुगावा लागल्याने त्याच्या बायकोने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटापासून जोडप्यांना परावृत्त करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या जोडप्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. नवरा बायकोने आता सहमतीने एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवलं आहे.

नयना आणि योगेश (दोघांची नावे बदललेली आहेत) यांची भेट ते काम करत असलेल्या बीपीओतील कँटीनमध्ये झाली होती. 2017 साली या दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं होतं, आणि पाहताक्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यानंतर 2019 साली दोघांनी लग्न केलं होतं.

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. योगेशचीही या काळात नोकरी गेली होती. योगेशने दुसरी नोकरी शोधायचा प्रयत्न सुरू केला होता, मात्र त्याला यश मिळत नव्हतं. नोकरी गेल्याच्या काही दिवसांनंतर योगेशचा स्वभाव बदलला असल्याचं नयनाला जाणवायला लागलं होतं. तो सतत लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये गुंतलेला असायचा आणि वेळीअवेळी कोणालातरी भेटायला जायचा. तो कोणाला भेटतोय हे नयनाने योगेशला विचारलं , मात्र त्याने तिला उडवाउडवीची उत्तरं दिली होती.

नयनाचा संशय बळावत गेल्याने तिने योगेश नेमकं काय करतोय हे शोधून काढण्यासाठी तिच्या भावाची मदत घेतली. भावाच्या मदतीने नयनाने योगेशचा लॅपटॉपमधल्या डेटाचा अॅक्सेस मिळवला. योगेशच्या लॅपटॉपमध्ये नयनाला त्याचे नग्नावस्थेतील फोटो सापडले, याशिवाय नयनाला योगेशच्या लॅपटॉपमध्ये महिलांचे अर्धनग्नावस्थेतील असंख्य फोटोही सापडले. होते. यातील एकही महिला तिच्या ओळखीची नव्हती.

यानंतर योगेशबाबत केलेल्या चौकशीमध्ये नयनाला कळालं की तो सेक्स वर्कर बनला असून तासाला 3 ते 5 हजार रुपये दर आकारतो. योगेशचे बंगळुरूत अनेक ग्राहक असल्याचंही तिला कळालं होतं. हे कळाल्यानंतर नयनाने योगेशला जाब विचारला होता. गडबडलेल्या योगेशने सुरुवातीला हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं होतं. यामुळे संतापलेल्या नयनाने योगेशपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

या दोघांचे समुपदेशन करण्यात आले तेव्हा योगेशने आपण सेक्स वर्कर बनल्याचे कबूल केलं होतं. आपण आपली चूक सुधारण्यासाठी तयार असून नयनापासून वेगळं व्हायची इच्छा नसल्याचं त्याने सांगितलं होतं. मात्र नयना आपल्या निर्णयावर ठाम असल्याने अखेर दोघांनी सहमतीने एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला.