भयंकर! मुलाच्या हव्यासापायी सातवेळा गर्भपात; महिलेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार

175
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादमधील सुमती या महिलेच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. या दहा वर्षात 31 वर्षाच्या सुमती सातवेळा गर्भवती झाल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांना जबरदस्तीने गर्भलिंग परीक्षणासाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. आता त्या पुन्हा गर्भवती असून गर्भलिंग परीक्षणात मुलगा असल्याचे समजल्याने कुटुंबीय समाधानी आहेत. मात्र, सातवेळा गर्भपाताचे आघात सहन केल्याने त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांच्यावर प्रंचड मानसिक दडपण असून सुलभ प्रसूती होण्यासाठी त्यांना या आघातातून बाहेर काढण्याची गरज मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सुमती रात्री अचानक झोपतून ओरडून जाग्या होतात. आपल्याला जबरदस्तीने गर्भपातासाठी नेण्यात येत असल्याचे स्वप्न त्यांना नेहमी दिसते. त्यांना असे नेहमी होत असल्याने त्यांना उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. सुमती मानसीकदृष्ट्या खचल्या आहेत. त्यांच्या मनात गर्भपाताची भीती निर्माण झाली आहे. सात वर्षात सातवेळा गर्भपात सहन केलेल्या सुमतीच्या मनावर याचा विपरीत परिणाम झाल्याचे मानसोपचार तज्ज्ञ वासुप्रदा कार्तिक यांनी सांगितले. या मानसिक दडपणामुळे त्यांना गर्भपाताची आणि भयावह स्वप्न पडतात. सातवेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याने त्यांना या आघातातून सावरण्याची संधीच मिळाली नाही असे कार्तिक यांनी सांगितले. पहिला गर्भपात झाल्यानंतर लगेच दुसरा आघात असे सलग सातवेळा त्यांच्यावर आघात झाले आहेत.

आपण मुलीला जन्म दिला नाही, हे चांगले झाले असे सुमती यांनी सांगितले. आपल्याला मुलगी झाली असती तर तिलाही अशाच संकटाचा समाना करावा लागला असता. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जसे नशीबावर सोडून दिले तशीच तिचा अवस्था झाली असती असे सांगत त्या रडायला लागतात. यावरून त्यांच्यावर झालेल्या आघातांची कल्पना येते, असे कार्तिक यांनी सांगितले. प्रत्येक गर्भपातानंतर आपल्याला मुलगा व्हावा,अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सातवेळा त्यांनी आघात सहन केल्यानंतर आता आठव्यावेळी त्यांना मुलगा होणार असल्याचे गर्भलिंग परीक्षणातून उघड झाले आहे. मात्र, सुलभ प्रसूतीसाठी त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.

वंशाला दिवा मिळण्यासाठी गर्भलिंग परीक्षण करून स्त्रीभ्रृण हत्येच्या घटना वाढत आहे. एका क्लिनीकमध्ये पाचवेळा जबरदस्तीने गर्भपात झालेल्या महिलेवर उपचार सुरू आहेत. गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर पुढचे अपत्यही गमवावे लागणार या भीतीने ती महिला रडायला लागते. या महिलेला या आघातातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. मुलाच्या हव्यासापायी तीनवेळा गर्भपात करण्याच्या घटना सर्रास घडत आहे, हे गंभीर आहे, असे गर्भवतींचे समुपदेशन करणाऱ्या डॉ. लावण्य मरीयाला यांनी सांगितले. मुलगा व्हावा, यासाठी कटुंबीयांनी जबरदस्तीने गर्भपात केल्याचे अनेक महिलांनी सांगितले आहे. प्रत्येकवेळी गर्भपातानंतर महिलेला शारीरिक आणि मानसिक आघात सहन करावे लागतात. अनेकदा त्यांना या दडपणातून बाहेर पडण्याची संधीच मिळत नाही आणि त्या मनोरुग्ण होतात, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या