कर्नाटकात कुमारस्वामी यांचेच सरकार राहणार; काँग्रेसने व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता वेगळेच वळण मिळाले आहे. काँग्रेसकडून शनिवारी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर काँग्रेस आशावादी असून राज्यात काँग्रेस- जेडीएस आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राहील असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. बंडखोर आमदार के.टी. एम. नागराज यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्य अधिक रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  काँग्रेसने मनधरणी केल्यानंतर नागराज यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले असून इतर बंडखोर आमदारांची समजूत घालणार असल्याचे सांगितले. इतर बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 16 जुलैपर्यंत कर्नाटकातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काँग्रेसकडून बंडखोर आमदारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी डी. के, शिवकुमार शर्थीचे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. तसेच बंडखोर आमदार नागराज यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असून राज्यातील कुमारस्वामी यांच्या सरकारला धोका नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, आमदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठी जेडीएस. काँग्रेस आणि भाजपनेही पक्षाच्या आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले आहे.

विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आमचे आमदार सरकारच्या बाजूने मतदान करतील. कुमारस्वामी यांच्या सरकारला कोणताही धोका नाही. बंडखेर आमदारांवर आमचा विश्वास आहे. अनेक वर्षापासून ते काँग्रेससोबत आहेत. काही कारणाने ते नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यात येणार आहे. आम्ही राज्यघटनेप्रमाणे वागत आहोत. या ठरावाच्यावेळी आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले नाही तर त्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका बदलली असून ते पक्षाच्या बाजूने उभे राहणार असल्याचा विश्वास शिवकुमार यांनी व्यक्त केला. सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी या ठरावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या आघाडीतील आमदारांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. भाजपनेही सरकारने बहुमत सिद्ध करावे असे आव्हान दिले आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय नाट्य अधिक रंगण्याची शक्यता आहे.