वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला पाकिस्तानविरुद्ध खेळावंच लागेल, अन्यथा…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या क्रिकेट विश्वचषकाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, तसं करता येणार नसल्याचं स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या 16 जून रोजी विश्वचषक स्पर्धेतला हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार आहे. पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी होत होती. बीसीसीआयच्या समितीने आयसीसीला पत्र लिहून पाकिस्तानचा बहिष्कार करण्याची मागणीही केली होती. मात्र, सामना खेळवला नाही तर हिंदुस्थानी संघाचंच नुकसान होऊ शकतं, असं आयसीसीचं म्हणणं आहे. त्यामुळे हिंदुस्थानला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावाच लागेल.

याचं कारणही आयसीसीने स्पष्ट केलं आहे. आयसीसीच्या स्पर्धांसाठी सगळ्या संघांचे सदस्य भागीदारीच्या करारावर स्वाक्षऱ्या करतात. त्यानुसार त्यांना या स्पर्धेतील नियोजित असलेले सर्व सामने खेळणं बंधनकारक आहे. जर एखाद्या संघाने सामना खेळण्यास नकार दिला, तर नियमांनुसार त्याच्याविरुद्ध खेळणाऱ्या संघाला अतिरिक्त गुण दिले जातील. त्यामुळे गुण गमवायचे नसतील तर हिंदुस्थानला पाकिस्तानविरुद्ध खेळावं लागेल, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.