आयसीसीची गुगली ‘पिच’कारी, टी-20 वर्ल्ड कपच्या तीन सामन्यांनाच खराब रेटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान ड्रॉप इन पिच आणि आऊटफिल्डमुळे आयसीसीची चांगलीच नाचक्की झाली होती. अमेरिकेत झालेल्या सामन्यांदरम्यान न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी  स्टेडियमच्या पिचवर फलंदाजांना धावाच काढता आल्या नव्हत्या. तसेच डल्लासच्या खेळपट्टीनेही निराश केले होते. लाऊडरहिलचे सामने तर पावसामुळे वाया केले होते. आयसीसीच्या या स्पर्धेत एपूण 52 सामने झाले, पण स्वतःची स्पर्धा असल्यामुळे त्यांनी केवळ तीन सामन्यांच्या खेळपट्टय़ांना खराब दर्जा देत गुगली टाकली आहे.

आयसीसीने नेहमीच आपल्या जागतिक स्पर्धा वगळता अन्य स्पर्धांना नेहमीच खराब दर्जा देण्यात कोणतीही दयामाया दाखवलेली नाही. मात्र अमेरिकेत झालेल्या सामन्यादरम्यान फलंदाजांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. सर्वच धडाकेबाज फलंदाजांना एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे न्यूयॉर्कच्या ड्रॉप इन खेळपट्टय़ांवर तर सारेच तुटून पडले होते. या खेळपट्टय़ांना खराब दर्जा मिळणार हे स्पष्ट असतानाही आयसीसीने स्पर्धेनंतर ते देणे टाळले. तरीही आयसीसीच्या पिच रेटिंगवर साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आयसीसीने ती रेटिंग दोन महिन्याने जाहीर केली असली तरी त्यात फिक्सिंग केल्याचे जाणवले आहे.

आयसीसीची बचावात्मक भूमिका

नासाऊवरचे सारेच सामने फलंदाजांसाठी धोकादायक ठरले होते. तरीही आयसीसीने केवळ हिंदुस्थान-आयर्लंड आणि श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यांना खराब रेटिंग दिले आहे. आयसीसीकडून खराब रेटिंग मिळाल्यानंतर त्या स्टेडियमला आयसीसीच्या यादीतून निलंबित केले जाते. पण आयसीसीने बचावात्मक भूमिका घेत आपल्या स्पर्धेला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

आठपैकी दोन सामन्यांना लाल शेरा

न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या आठपैकी सहा सामन्यांना आयसीसीने समाधानकारक रेटिंग देत सावरण्याचा प्रकार केला आहे. वर्ल्ड कपच्या 52 पैकी अनेक सामने लो स्कोरिंग झाले आणि अनेक पिच आणि आऊटफिल्डने खेळाडूंच्या नाकी दम आणला होता. या खेळपट्टय़ांवर खेळाडूंसह अनेक दिग्गजांनी अक्षरशः टीकांचा पाऊस पाडला होता. न्यूयॉर्कच्या खेळपट्टय़ांवर एका डावात सरासरी 100 धावा होणेही अवघड होऊन बसले होते. या स्पर्धेत रंजन मदुगले, डेव्हिड बून, जेफ क्रो आणि  रिची रिचर्डसन हे दिग्गज सामनाधिकारी होते. त्यामुळे त्यांचा खेळपट्टय़ांना लाल शेरा मिळणार हे निश्चित होते. पण यांनी बहुतांश खेळपट्टय़ांना सावरत केवळ तीन सामन्यांनाच खराब खेळपट्टीचा शेरा मारला. त्रिनिदादला खेळला गेलेला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेलेला उपांत्य सामन्याला खराब दर्जा दिला. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ 56 धावांवरच गुंडाळला गेला होता. म्हणून आयसीसीने या सामन्याला असमाधानकारक मानले आहे. मात्र अंतिम सामन्याच्या खेळपट्टीला अप्रतिम असा दर्जा देत स्पर्धेवर अपयशाचे ढग दूर करण्याचा प्रयत्न केला.