ICC WTC Final तारीख, ठिकाण ठरलं! ‘या’ दिवशी रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी याची घोषणा केली आहे. त्यानुसार जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर रंगणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाईल. 12 जून हा राखीव दिवस असणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत 24 कसोटी मालिकेतील 61 कसोटी सामन्यांनंतर कसोटी चॅम्पियनशिप पदासाठी हा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात खेळवला गेला होता. 2021मध्ये साऊथहॅम्प्टन येथे झालेला हा सामना न्यूझीलंडने जिंकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप किताब आपल्या नावे केला होता.

5 संघांत चुरस

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक 75.56 टक्के गुणांसह अव्वल स्थानी, तर हिंदुस्थान 58.93 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थानसह दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व वेस्ट इंडीज या संघांमध्ये चुरस आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या 4 कसोटी सामन्यांची मालिका जिंकणारा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट बुक करणार एवढे नक्की.