नवाब मलीक जे बोलत होते, ते खरे ठरले; सुप्रिया सुळे यांची केंद्रीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सीबीआय चौकशी सुरू असलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 8 जूनला होणार आहे, त्यामुळे 8 तारखेपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

आर्यन खान प्रकरणात सीबीआयने शनिवारी सुमारे वानखेडे यांची सुमारे 5 तास चौकशी केली. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुपिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, नवाब मलिक जे बोलत होते, ते खरे होते, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांना 22 मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे सोमवारी त्यांच्या अटकेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने अटकेपासून संरक्षणाचा निर्णय कायम ठेवला असून पुढील सुनावणी 8 जूनला होणार असल्याचे स्पष्ट केले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यात चांगलीच जुंपली होती. आता, याप्रकरणी नवाब मलिक तेव्हा जे सांगत होते तेच खरं होतं, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

नवाब मलिक जे सातत्याने म्हणत होते, ते आता कसे खरे होत आहे बघा. हे दुर्दैवी असून मी नक्कीच हा विषय संसदेत मांडणार आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या फिल्म स्टारच्या मुलाचे असे हाल होऊ शकतात, तर या देशात सर्वसामान्य माय-बाप जनतेच्या पोरांनी काय करावे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलाला हे सरकार एवढा त्रास देऊ शकतं, तर सर्वसामान्य माणसांचं काहीच राहणार नाही. हे चिंताजनक आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे, तुम्ही ईडी-सीबीआय काय वापरायचंय ते वापरा, पण लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलावर अन्याय करू नका, अशी मागणीही त्यांनी केलीय.