सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळविल्यास रस्त्यावर उतरू; वैभव नाईक यांचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथे मंजूर झालेला पाणबुडी पर्यटन प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचा गुजरात सरकार व केंद्र सरकारचा डाव आहे. जिल्ह्यातील अशाप्रकारचा चांगला प्रकल्प पळविणे म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखेच आहे. हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरेल तसेच हा प्रकल्प सिंधुदुर्गात तसेच महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक येथे होऊ घातलेला पाणबुडी प्रकल्प गुजरात द्वारका येथे नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत, हा प्रकल्प सिंधुदुर्गातच झाला पाहीजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आमदार वैभव नाईक म्हणाले की, कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2018 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पाणबुडी पर्यटन प्रकल्प आणला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली होती. त्यानंतर पाणबुडीला मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पात दिडशे ते दोनशे कोटी कोटींच्या पाणबुडींना प्राथमिक टप्प्यात मंजूरी देण्यात आली होती. यासंदर्भात सर्व्हेही करण्यात आला. कन्सल्टंटही नेमण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षभरात याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले.

नुकताच मालवण येथे नौसेना दिन साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गातील समुद्र किनार्‍याची दखल संपूर्ण देशाने, जगाने घेतली. पर्यटन दृष्ट्या मालवणसह सिंधुदुर्गचे नाव जगाच्या नकाशावर गेले. परंतू सिंधुदुर्गात आलेला हा चांगला प्रकल्प गुजरातला नेण्याचा गुजरात सरकार आणि केंद्र शासनाचा डाव आहे. हा त्यांचा डाव आता उघड झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तीन सुपुत्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत तर एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. जिल्ह्यातील चार सुपुत्र मंत्री असतानाही हा प्रकल्प पळविणे म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखेच आहे. हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरेल तसेच हा प्रकल्प सिंधुदुर्गात तसेच महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. राज्यातील सरकार हे गुजरात सरकार, केंद्र सरकारच्या ताटाखालचे मांजर बनले आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केला आहे.