’इफ्फी’ महोत्सवाची सांगता; ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ला सुवर्ण मयूर

53 व्या ‘इफ्फी’ महोत्सवाची सोमवारी गोव्यात दिमाखात सांगता झाली. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार यंदा ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या स्पॅनिश चित्रपटाने पटकावला. ‘नो एंड’ मधील भूमिकेसाठी वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ साठी डॅनिएला मारिन नवारो हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित केले. ‘नो एंड’साठी नादेर साईवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले.

इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात यंदा 15 चित्रपटांमध्ये प्रतिष्ठsच्या सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी चुरस होती. यात ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ने बाजी मारली. फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’साठी विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. प्रवीण कांड्रेगुला यांनी ‘सिनेमाबंदी’ या तेलुगु चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार पटकावला.

अभिनेते चिरंजीवी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझे नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असे होते, चित्रपटसृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणाऱया माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणाऱया चित्रपटसृष्टीचा मी आयुष्यभर ऋणी राहील असे ते म्हणाले.

‘कश्मीर फाईल्स’ हा प्रोपोगंडा चित्रपट
‘इफ्फी’ महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या ज्यूरी मंडळाचे अध्यक्ष नदाव लॅपीड यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर निशाणा साधला आहे. नदाव लॅपीड म्हणाले, ‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट विशिष्ट विचारधारेचा प्रचार (प्रोपोगंडा) करणारा आहे. असा चित्रपट इफ्फीच्या महोत्सवात आलाच कसा, तो या महोत्सवामध्ये येणे ही मोठी धक्कादायक बाब आहे.’ त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.