मुरबाडकरांचे पाणी वीटभट्ट्यांमध्ये मुरले

39

सामना प्रतिनिधी । मुरबाड

डोंगराळ भागात वसलेल्या वाड्यापाड्यांनी व्यापलेल्या मुरबाड तालुक्याला फेब्रुवारी महिना उजाडताच पाणीटंचाईची झळ सुरू होते. ऐन थंडीतच तालुक्यातील नदी, ओढे आटत असल्याने मुरबाडकरांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र मुरबाडकरांच्या या पाणीबाणीला वीटभट्टीवाले सर्वाधिक जबाबदार असल्याचे उघडकीस आले आहे. रॉयल्टी बुडवण्यासाठी कल्याण, बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील वीट व्यावसायिकांनी मुरबाडच्या नदीकिनारी भट्टय़ा पेटवल्या असून मोठय़ा प्रमाणात माती आणि पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे नद्या कोरड्याठाक पडत असून गावपाडय़ातील रहिवाशांच्या नशिबी टँकरचा फेरा येतो. याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने वीटभट्टीवाल्यांनी तालुक्यात फुकटात हातपाय पसरवले आहेत.

मुरबाड तालुक्यात 126 गावे असून महसूल विभागाच्या 5 परिमंडळांतर्गत 29 तलाठी महसूल वसूल करते. मात्र गेल्या काही वर्षांपासून इतका फौजफाटा असून महसूल विभाग कोमात गेल्याने तालुक्यात बेकायदा बांधकाम, खदानी वाढल्या असून त्यामध्ये वीटभट्टीवाल्यांची भर पडली आहे. वीटभट्टी चालवण्यासाठी शासनाला महसूल द्यावा लागतो. हा महसूल बुडवण्यासाठी वीट व्यावसायिकांनी मुरबाडच्या जंगलांमध्ये आसरा घेतला आहे. गावागावांतील नदी, ओढय़ांकाठी वीटभट्टय़ा मोठय़ा प्रमाणात धगधगत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या मातीची लूट होत आहेच, पण पाणीउपसाही मोठय़ा प्रमाणात होत आहे. या बेकायदा वीटभट्टय़ांमुळेच तालुक्यात पाणीटंचाई वाढली असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वडवले, शरद पवार यांनी केला, तर उन्हाळ्यात टँकरचे नियोजन करण्याऐवजी जिल्हा प्रशासनाने आधी वीटभट्टय़ा बंद कराव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य विष्णू धाडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकाऱयांना निवेदन दिले आहे.

2016-17 मध्ये रॉयल्टी चोरणाऱ्या 70 वीटभट्टय़ांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आता जर अनधिकृत वीटभट्टी निदर्शनास आली तर तत्काळ कारवाई करण्यात येईल. – सचिन चौधरी, तहसीलदार

आपली प्रतिक्रिया द्या