
दापोली तालुक्यातील दाभिळ आणि खेड तालुक्यातील कर्जी खाडीपट्टयात सक्शन पंपाव्दारे राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल प्रशासन आणि खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वाळू उपशाला महसुल आणि खनिकर्म अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
शासनाच्या तिजोरीत वाळू उपशाद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. वाळू उपशाच्या रॉयल्टीव्दारे शासनाला मोठी रक्कम मिळते. मात्र, दापोली तालूक्यातील उन्हवरे, पांगारी, दाभिळ आणि भोपण या तालूका ठिकाणापासून दुर आणि दुर्गम भागातील ठिकाणी अवैधरित्या मोठयाप्रमाणात वाळू उपसा होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शासनाचा महसूल बु़त आहे.
खाडीजवळ राहणाऱ्या एखाद्या रहीवाशाने घराच्या दुरूस्तीसाठी अथवा बांधकामासाठी नदीतील अथवा खाडीतील रेती बांधकामापुरती काढली तर हेच अधिकारी अव्वाच्या सव्वा दंड आकारून सर्वसामान्यांना त्रास देतात. तर दुसरीकडे मात्र अवैध वाळू उपशाने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडीत जात असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शासनाने वाळू उपसा करण्यास बंदी आणली आहे.असे असताना दापोली तालुक्यातील दाभिळ व खेड तालुक्यात कर्जी खाडीपट्टयात वाळू उपशाला फक्त मुभा आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. दररोज सायंकाळी दाभिळ खाडीत सक्शन पंपांची घरघर सुरू होते. एक ठिकाणी हातपाटी वाळू उपशाची परवानगी घेण्यात आली आहे. अशा ठिकाणी सक्शन पंपाने वाळू उपसा केला जात असून जेसीबीच्या साह्याने वाळू उपसली जात आहे. सक्शन पंपाने वाळू उपसा सुरू असताना अधिकारी गप्प का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
उन्हवरे, दाभिळ, पांगारी, भोपण आदी ठिकाणच्या खाडी किनारी खारफुटीची झाडे आहेत या झाडांची वाळू माफिया हे खारफुटीची कत्तल करून वाळू व्यवसाय थाटत आहेत. मात्र अशा वाळू माफियांवर कारवाई होताना दिसत नाही. याबाबत महसूल विभाग कारवाई बाबतची बोटचेपी भूमिका का बरं घेत आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.


























































