असे जागावाटप जगाच्या पाठीवर कुठेच होत नाही; प्रकाश आंबेडकर मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत – संजय राऊत

‘‘प्रकाश आंबेडकर व त्यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीची घटक आहे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना आघाडीत समाविष्ट करून घेतले. तीन पक्षांना जागा वाटप करावे आणि त्यांच्याकडून आम्ही हव्या त्या जागा मागून घेऊ,’’ अशी त्यांची भूमिका आहे. अशा प्रकारचे जागा वाटप जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, असे शिवसेना नेते – खासदार संजय राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे, कारण त्यांना अप्रत्यक्षपणे मोदींना मदत करायची आहे. पण आंबेडकर मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत असा मला विश्वास आहे,’’ असेही ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे. त्यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘‘प्रकाश आंबेडकरांना राजकारण उत्तम कळते आणि त्यांना चांगल्या भूमिकाही कळतात. त्यांना कुठल्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार आहोत आणि त्यांनाही माहीत आहेत. त्यांच्याकडून काही भूमिका येत असतील तर त्यावर चर्चा करू. 27 तारखेला आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीला त्यांना आमंत्रित केलेले आहे. त्यांनी येण्याचे मान्य केलेले आहे,’’ असे राऊत म्हणाले.

श्रीकांत शिंदेंना लायकी नसताना पक्षाने उमेदवारी दिली
हेलिकॉप्टर प्रवासावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरूनही संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला. श्रीकांत शिंदे यांना लायकी नसताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘‘श्रीकांत शिंदे म्हणतात त्यांना पक्षाने जबाबदारी दिली होती, पण पक्षाने दिली नव्हती तर ते बेरोजगार होते. त्यांच्याकडे काम नव्हते. फक्त डिग्री होती. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण याचे वडील आले आणि उद्धव ठाकरे यांना विनंती केली. माझा मुलगा सध्या मोकळाच आहे, त्याला खासदारकी दिली तर मी त्याला कल्याणमधून निवडून आणेन, असे म्हणाले. एखाद्याला नोकरीला चिकटवतो तसे उद्धव ठाकरे यांनी त्यांना चिकटवले. पक्षाचा विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांनी माणुसकीच्या नात्याने श्रीकांत शिंदे यांना दोन वेळा खासदार केले. तेव्हा एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेतेही नव्हते,’’ याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.