शाहरूखला खटल्यासाठी बोलावलं तर किती गोंधळ उडेल याची कल्पना करा! – गुजरात हायकोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी घडलेल्या एका घटनेवरून शाहरूख खान याच्यावर खटला चालवण्याची मागणी होत आहे. या खटल्यावरून गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती जस्टिस निखिल करियल यांनी एक मजेशीर टिप्पणी केली आहे. शाहरूख खानला खटल्यासाठी बोलावलं तर काय गोंधळ होईल याचा विचार करा, असे न्यायमूर्ती वकिलांना उद्देशून म्हणाले.

शाहरूख खान याची प्रमुख भीमिका असणारा ‘रईस’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या चित्रकरण आणि प्रमोशनसाठी शाहरूख खान वडोदरा रेल्वे स्थानकावर आला होता. त्यावेळी शाहरुख खान याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती आणि यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाच्या मृत्यूला शाहरूख खान याला जबाबदार धरून त्याच्यावर खटला चालवण्याची मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण?

23 जानेवारी 2017 रोजी शाहरूख खान रईस चित्रपटाय्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ‘अगस्त क्रांति एक्स्प्रेस’मध्ये आला होता. या ट्रेनमधील कोचचे रिझर्व्हेशन नसतानाही शाहरूख खान रेल्वेमध्ये प्रमोशनसाठी आला होता. ही ट्रेन वडोदरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 6 वर थांबली होती. शाहरूख सारखा अभिनेता आल्याने त्याला पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान शाहरूख खान याने आपला टी शर्ट आणि एक चेंडू गर्दीच्या दिशेने भिरकावला होता. हा टी शर्ट आणि चेंडू घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि याच दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला.

कुटुंबियांची न्यायालयात धाव

मृताच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच त्यांनी सदर घटनेसा शाहरूख खान याला जबाबदार धरले आणि त्याच्या विरोधात वडोदरा येथील एका न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. हे प्रकरण नंतर गुजरातच्या हाय कोर्टामध्ये पोहोचले. याची सुनावणी गुरुवारी पार पडली.

कोर्ट काय म्हणाले?

कोर्टामध्ये शाहरूखच्या वकिलांना त्याची बाजू मांडताना सांगितले की, शाहरूख खान याने कोणताही गुन्हा केलेला नाही. मृतकाला ह्रदयासंबंधी व्याधी होती आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. यावर हाय कोर्टाचे न्यायमूर्ती निखिल करियल यांनी मृताच्या कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलाला उद्देशून म्हटले की, तक्रारदाराची इच्छा असल्यास आपण शाहरूख खान याला माफी मागण्यास सांगू. तसेच एकदा सेलिब्रिटी न्यायालयात आले की पुन्हा गोंधळ उडू शकतो. हा खटला चालवायचा झाल्यास शाहरूख खान याला पुन्हा पुन्हा कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील, अशावेळी उडणाऱ्या गोंधळाची कल्पना न केलेली बरी असेही न्यायालयाने म्हटले. या प्रकरणी न्यायालायने पुढील सुनावणीची तारीख दिली असून पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे.