प्रॉमिसिंग – सिंधुताई साकारणे आव्हानात्मक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

कलर्स मराठी वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत वेगळे वळण आले आहे. सिंधुताईंच्या भूमिकेत शिवानी सोनार ही अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे. शिवानी सोनार एक प्रॉमिसिंग चेहरा…

शिवानीचे शालेय शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. लहानपणी तिला नृत्यकलेची आवड होती, पण पुढे पुण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कॉलेजमधील ‘कला मंडळात’ ती सहभागी झाली. पुण्यातील प्रसिद्ध अशा पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धांतून कॉलेजतर्फे सादर होणाऱ्या एकांकिकेत शिवानी आवर्जून सहभागी होत असे. शिवानी म्हणते, ‘‘अभिनयाबद्दल मला आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रातसुद्धा आपण करीअर करू शकतो ही जाणीव हळूहळू मनात पक्की होऊ लागली होती. पुण्यातील विविध प्रायोगिक नाटय़समूहांच्या नाटकांतूनदेखील मी अभिनय करत होते.’’

त्याचदरम्यान विविध मालिकांसाठी शिवानी ऑडिशन देत होती आणि मग ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतील ‘लक्ष्मी’ ही व्यक्तिरेखा तिने साकारली. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत तिने साकारलेली ‘संजू’ सर्वांच्या चांगलीच लक्षात राहिली. या भूमिकेकरिता तीन वर्षे तिला सांगलीत रहावे लागले होते. ही मालिका संपल्यावर शिवानीच्या आयुष्यात अतिशय आव्हानात्मक संधी आली आणि ती म्हणजे ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंची भूमिका करण्याची. शिवानी म्हणते, ‘‘मला या भूमिकेसाठी तीन-चार ऑडिशन द्याव्या लागल्या होत्या, पण मला माहीत नव्हते की, आपण नेमके कोणत्या भूमिकेसाठी ऑडिशन देत आहोत. एक ऑडिशन ही वऱ्हाडी बोलीत झाली आणि त्यानंतर जेव्हा मला कळले की, मला माईंची भूमिका करायची आहे, तेव्हा मला खूप दडपण आले होते. या वेळी माझ्या वडिलांनी मला खूप सहकार्य केले. माईंचा अर्थात सिंधुताईंचा वय वर्षे 20 ते वय वर्षे 40 असा प्रवास मला या भूमिकेतून दाखवायचा आहे. मी त्यासाठी सिंधुताईंच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींशी चर्चा केली. ‘मी वनवासी’ या पुस्तकाचे तीन-चार वेळा वाचन केले. आता मी वऱ्हाडी भाषा शिकत आहे .’’ या भूमिकेच्या निमित्ताने शिवानीने ओवी गायनदेखील केले आहे.