IND vs ENG – राजकोटमध्ये ‘हिटमॅन’चं शतक, धोनीला मागे सोडलं; 73 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला

राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये हिंदुस्थानने जोरदार पुनरागमन केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 33 अशा खराब अवस्थेत सापडलेला हिंदुस्थानचा डाव कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने सावरला. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधील 11 वे शतक ठोकले. बाद होण्यापूर्वी रोहितने 196 चेंडूत 131 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रम केले.

कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने तब्बल 218 दिवसानंतर शतक झळकावले. या शतकी खेळीसह त्याने 73 वर्षांपूर्वीचा एक विक्रमही मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून शतक ठोकणारा रोहित सर्वात वयस्कर (36 वर्ष व 291 दिवस) कर्णधार ठरला आहे. रोहितने विजय हजारे (36 वर्ष व 278 दिवस) यांचा विक्रम मोडला. हजारे यांनी 1951 मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.

धोनीला मागे सोडलं

रोहित शर्माने आपल्या या शतकी खेळीदरम्यान 3 उत्तुंग षटकारही ठोकले. या षटकारांच्या मदतीने रोहितने (79*) धोनीला (78) मागे सोडत हिंदुस्थानकडून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पहिल्या स्थानावर विरेंद्र सेहवाग असून त्याच्या नावावर 90 षटकारांची नोंद आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

चौथा सलामीवीर

राजकोटमध्ये कसोटी शतक ठोकणारा रोहित शर्मा हिंदुस्थानचा तिसरा आणि एकूण चौथा सलामीवीर ठरला. याआधी या मैदानावर पृथ्वी शॉ (2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा), एलिस्टर कूक (2016मध्ये हिंदुस्थानविरुद्ध 130 धावा) आणि मुरली विजय (2016मध्ये इंग्लंडविरुद्ध 136 धावा) यांनी शतक ठोकलेले आहे.

जयसूर्याचा विक्रम मोडला

सलामीवीर म्हणून रोहित शर्मा याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42 वे शतक ठरले. रोहितने 339 डावांमध्ये हा टप्पा गाठत ख्रिस गेलचा (506 डाव) विक्रम मोडला. तसेच सनथ जयसूर्याच्या 41 शतकांनाही रोहितने मागे सोडले.