
वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी हिंदुस्थान-चीन हे दोन्ही देश राजी झाले आहेत. संघर्ष थांबवण्यासाठी आराखडा बनवण्यात आला आहे. त्यानुसार तणावानंतर पूर्व लडाखच्या सीमेवर दोन्ही देशांनी उभारलेल्या नवीन चौक्या पाडल्या जाणार आहेत. तसेच फिंगर 4 ते फिंगर 8 परिसरात गस्त व इतर कारवाया बंद केल्या जाणार आहेत. कुरापतखोर चीन नरमल्याने हिंदुस्थानने संयम दाखवला आहे.
एप्रिल-मेनंतर हिंदुस्थान-चीनमधील तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांनी लडाखच्या सीमेवर पेंगॉग सरोवर परिसरात नवीन चौक्या उभारल्या होत्या. या चौक्या पाडून दोन्ही देश आपल्या लष्कराला पूर्वीच्या स्थितीत तैनात ठेवणार आहे. देपसांगच्या मैदानी परिसराच्या मुद्दय़ावर नंतर स्वतंत्रपणे बोलणी केली जाणार आहे. याठिकाणी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) हिंदुस्थानी लष्कराचे काही पॉईण्ट्स बंद केले आहेत. त्याचबरोबर दोन पेट्रोलिंग पॉईण्टसचा तिढाही लवकरच सोडवण्यात येणार आहे. याठिकाणी चीनचे सैन्य अजूनही अडून बसले आहे.
पहिल्या टप्प्यात येथून माघार घेण्यास चीनचे सैन्य तयार नाही. पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 6 नोव्हेंबरला उच्च कमांडर पातळीवर चर्चा झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने सीमेवरील संघर्षासंबंधी हालचाली थांबवण्यात येणार आहेत. दोन्ही देश सलग तीन दिवस दररोज 30 टक्के लष्कर मागे बोलावणार आहे. पेंगॉगमधून तीन टप्प्यांत लष्कर मागे हटणार आहे.
गलवान खोऱ्यात संघर्ष झाल्यानंतर हिंदुस्थानने या परिसरात तब्बल 60 हजारांहून अधिक जवान आणि आधुनिक शस्त्रसामग्री तैनात केली होती. चिन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी एलएसीवर उंच उंच डोंगरांवर फौज सज्ज ठेवण्यात आली होती. दुसरीकडे चीननेही मोठय़ा प्रमाणावर सैन्य तैनात ठेवले होते.
























































